कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याची राष्ट्रवादीची मागणी

कल्याण : महाराष्ट्रात कोरोना(corona) रुग्णांची संख्या वाढतच असून वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय आहे. एकिकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे खाजगी रुग्णालयात नागरिकांची लूट होत आहे. ही लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याची आणि लॉकडाऊन काळात महावितरणने पाठवलेले भरमसाठ वीजबिल अर्धे माफ करण्याची मागणी, राष्ट्रवादीचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे(novel salwe) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अनेक लोक बेकार झाले. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. ज्या वेळेस राज्य सरकारने कोरोनाला महामारी घोषित केले त्यावेळी राज्य सरकारने घोषणा केली होती की राज्यातील कोरोना ग्रस्त प्रत्येक नागरिकाला मोफत इलाज मिळेल. मात्र सध्या राज्यात परिस्थिती वेगळी आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन लावतांना जे कुटुंब भाड्याने राहत आहे किंवा जो भाडयाच्या दुकानात व्यवसाय करत आहे त्यांना या लॉकडाउनच्या काळात भाडे देण्याची गरज नसल्याचे सांगितले होते. परंतु तसे काही झाले नाही. उलट जागा मालकाने जागा खाली करण्याचा तगादा लावत अनेक लोकांना घर आणि दुकाने रिकामी करायला लावली. बरेचसे लोक या लॉकडाऊनमुळे बेघरही झाले आहेत.

आगोदरच कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे जनता देशोधडीला लागुन हैराण झाली होती.  तेवढयात महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीजबिल देउन जुलुम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे दु:ख आणि अडचणी लक्षात घेऊन राज्यात सर्व कोरोनाग्रस्त नागरिकांना सरसकट मोफत इलाज मिळावा. ज्या देशात एखाद्या रोगराईला किंवा आजारपणाला महामारी घोषित केलं जातं तिथे जनतेची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची असते. तसेच कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत त्रस्त झालेल्या नागरिकांना सहानुभूती दाखवून राज्य सरकारने अर्धे वीज बिल माफ करावे अशी मागणीदेखील नोवेल साळवे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे माजी प्रदेश सरचिटणीस पारसनाथ तिवारी, सुभाष गायकवाड, प्रकाश तरे, रमेश गंगावणे, शरद गवळी आदी उपस्थित होते.