भिवंडीत महसूल विभागाची धडक कारवाई, पडघ्यातील अतिक्रमित बांधकामावर महसूल विभागाचा नांगर

भिवंडी - भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या सर्वे नं.१०१/१ या सरकारी जमीनीवर भुमाफियांनी अतिक्रमण करून चाळींचे बांधकाम केले होते. सुरुवातीला छोट्या चाळी बांधून जमीन

 भिवंडी – भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या सर्वे नं.१०१/१ या सरकारी जमीनीवर भुमाफियांनी अतिक्रमण करून  चाळींचे बांधकाम केले होते. सुरुवातीला छोट्या चाळी बांधून जमीन हडप करायची व नंतर टोलेजंग गोदामे निर्माण करून लाखो रुपये पदरात पाडायचे असा व्यवसाय भूमाफिया करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणाविरोधात स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी ,प्रांत अधिकारी व तहसीलदारांकडे लेखी तक्रारी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी गुरुवारी महसूल पथकासह जेसीबी मशीन घटनास्थळी उपलब्ध करून अतिक्रमण केलेल्या चाळींच्या बांधकामावर नांगर फिरवून बांधकाम उद्धस्थ केले.

पडघा येथे पाच भुमाफियांनी शासकीय जमीनीवर अतिक्रमण करून जमीन अनधिकृतपणे बिनशेती उपयोगात आणल्याने व अतिक्रमण करून सरकारी  जमीन हडपण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भिंवडी तहसीलदार शशीकांत गायकवाड यांनी पाच अतिक्रमण धारकांना नोटीस बजावली होती. अतिक्रमण धारकांनी सात दिवसांत सदरचे अतिक्रमण स्वतःहून दुर करण्याचे नोटीसमध्ये फर्मावले होते.मात्र मुदत संपून देखील भूमाफियांनी  सदरचे अतिक्रमण दूर करण्याकडे दुर्लक्ष केले होते त्यामुळे अखेर तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी निवासी नायब तहसीलदार गोरख फडतरे,महेश चौधरी (महसूल) ,मंडळ अधिकारी बी.एम.टाकवेकर ,किरण केदार ,तलाठी शैलेश भोजने ,संतोष आगीवले,अविनाश राऊत आदींच्या पथकासह घटनास्थळी उपस्थित राहून जेसीबी मशीनच्या सहाय्याने अतिक्रमण तोडून टाकण्यात आले आहे. या शासकीय कारवाईचा खर्च भूमाफियांकडून वसूल करण्यात येईल अशी माहिती नायब तहसीलदार महेश चौधरी यांनी दिली आहे.