भिवंडी तालुक्यात पावसाअभावी भात रोपे सुकू लागली, शेतकरी चिंताग्रस्त

भिवंडी : गेल्या पंधरा दिवसांपासून वरूणराजाने दडी मारल्याने भाताची रोपे करपू लागली आहेत. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. अजून काही दिवस पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांवर भाताच्या बियांची

 भिवंडी : गेल्या पंधरा दिवसांपासून वरूणराजाने दडी मारल्याने भाताची रोपे करपू लागली आहेत. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. अजून काही दिवस पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांवर भाताच्या बियांची दुबार पेरणी करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी भिवंडी पंचायत समितीच्या सभापती रविना जाधव यांनी केली आहे .

भिवंडी हा कृषीप्रधान तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात १६हजार २८० हेक्टर जमिनीवर २६ हजार शेतकरी भातशेतीची लागवड करीत आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी भिवंडी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून भाताचे बियाणे तसेच बाजारातून भाताचे बियाणे विकत घेऊन पेरणी केली. मात्र १२ जूनपासून पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतात हिरवेगार बनलेले रोप आता करपून सुकण्यास सुरुवात होऊन ते आता पिवळ्या रंगाचे बनत चालले आहेत. त्यामुळे काही शेतकरी शेतात असलेल्या विहिरीचे पाणी वीज पंपाच्या सहाय्याने भाताच्या रोपांना देऊन त्यांना जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तथापि माळरानावर जमिनी असलेल्या शेतकऱ्यांची रोपे वाचवण्यासाठी पाणी वाहून आणण्याची धडपड सुरु आहे . पाऊस पडला नाही तर मात्र भाताचे पीक पूर्णपणे सुकून जाईल. त्यानंतर भाताचे नवीन बियाणे विकत घेण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर असेल. आधीच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बेताची बनली असून निसर्ग चक्रीवादळानेही शेतकऱ्यांना जोरदार तडाखा दिला. आता पावसाअभावी शेतकरी चिंतेत झाला आहे, असे झिडका गावाचे शेतकरी दयानंद पाटील व किरवलीचे शेतकरी सूरदास पाटील यांनी सांगितले.