रस्ते दुरुस्तीच्या अधिकृत आर्थिक गैरप्रकाराला आळा कधी? नवी मुंबईतील रस्ते, खड्डे व ओबडधोबड पॅच मारलेलेच

नवी मुंबईत शहरांतर्गत रस्ते कधी गुळगुळीत होणार याबाबत नागरिक संभ्रमात आहेत.  दरवर्षी तयार केलेले रस्ते ऐन पावसात कसे काय वाहून जातात?  त्यात काय गौबंगाल आहे अस प्रश्न पडतो. दरवर्षी रस्ते दुरुस्तीसाठी पालिका कोट्यवधी रुपयांची तरतूद करते. मात्र शहरातील रस्ते दरवर्षी दुरुस्त का करावे लागतात याबाबत अद्यापही कोणत्याही आयुक्तांना प्रश्न पडलेला दिसून येत नाही. कंत्राटदार, अधिकारी व राजकारण्यांची ही अभद्र युती मोडीत काढण्याचे धारिष्ट्य आयुक्त बांगर दाखवणार का? असा प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहे.

  सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : आधुनिक शहराला दरवर्षी चढवला जाणारा स्वच्छतेचा साज हा कौतुकास्पद असला तरी शहरातील अंतर्गत रस्त्यांबाबत मात्र पालिकेची कामगिरी सुमारच राहिली आहे. नवी मुंबई शहरात अद्यापही पालिकेला खड्डेमुक्त व पॅचेस नसलेले गुळगूळीत रस्ते तयार करण्यात अपयश आले आहे. त्यात  गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना अद्यापही रस्ते खड्डेयुक्त दिसून येत आहेत. तर अनेक रस्त्यांवर वाकडे तिकडे पॅचेस मारल्याने रस्त्यांतील अडथळे संपलेले दिसून येत नाहीत.

  याआधी सायन पनवेल महामार्गावर खड्डे असल्याने नवी मुंबईची प्रतिमा मालिन होत असल्याचा आरोप  करत नवी मुंबई क्षेत्रात येणारा सायन पनवेल महामार्ग नवी मुंबई पालिकेकडे हस्तांतरीत करावा अशी मागणी नवी मुंबईने केलेली असताना;नवी मुंबईकरांना मात्र शहरांतर्गत गुळगुळीत रस्ते कधी मिळणार असा प्रश्न दुसऱ्या बाजूने नवी मुंबईकर विचारत आहेत.

  नवी मुंबईत शहरांतर्गत रस्ते कधी गुळगुळीत होणार याबाबत नागरिक संभ्रमात आहेत.  दरवर्षी तयार केलेले रस्ते ऐन पावसात कसे काय वाहून जातात?  त्यात काय गौबंगाल आहे अस प्रश्न पडतो. दरवर्षी रस्ते दुरुस्तीसाठी पालिका कोट्यवधी रुपयांची तरतूद करते. मात्र शहरातील रस्ते दरवर्षी दुरुस्त का करावे लागतात याबाबत अद्यापही कोणत्याही आयुक्तांना प्रश्न पडलेला दिसून येत नाही. कंत्राटदार, अधिकारी व राजकारण्यांची ही अभद्र युती मोडीत काढण्याचे धारिष्ट्य आयुक्त बांगर दाखवणार का? असा प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहे.

  मात्र दुसरीकडे पालिका मुख्यालयाचा तयार केलेला रस्ता मात्र दर्जेदार कसा काय? त्यावर एकही खड्डा पडलेला नाही. ही दिखावेगिरी का? हाच दर्जा शहरात इतरत्र का वापरला जात  नाही? की हक्काचा भ्रष्टाचार म्हणून त्याकडे कायम दुर्लक्ष केले जात आहे का? असा प्रश्न पडतो. ज्या पद्धतीने अनधिकृत बांधकामांवरील करवाईबाबत आयुक्तांकडून असमाधान व्यक्त केले होते. एकूणच आयुक्तांच्या डोळ्यांत अधिकारीच धूळफेक करत असल्याचे यातून सिद्ध झाले असतानाच; रस्त्यांच्या बाबतीत आयुक्त दर्जा कधी तपासणार? अनेकदा निकृष्ट कामाबाबत अनेकदा कंनत्रातदारांवर टांगती तलवार असते.

  या कामात सापडल्यावर कंत्राटदाराला धारेवर धरले जाते. मात्र मग दुसरीकडे ज्या अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली अथवा आशीर्वादाने रस्ते तयार केले  जातात त्या अभियंत्यांवर आयुक्त कारवाई करण्याची धमकी दाखवणार का? असा प्रश्न समोर येत आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी कोविड टेस्टिंग घोटाळा व उद्यान घोटाळ्याला सामोरे जात अनेकांना निलंबित केले होते. मात्र रस्त्याबाबत मात्र अधिकृतपणे दरवर्षी होत असलेला भ्रष्टाचार आयुक्त थांबवणार का?  असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. त्यामुळे आधुनिक शहरात सेवा देणाऱ्या नवी मुंबई पालिकेची प्रतिमा मालिन होऊ लागली आहे.

  आयुक्त बांगर यांनी कोविडमध्ये महापालिकेत पदभार स्वीकारतात आरोग्य यंत्रणा सुधारण्याकडे व बळकटीकरणाचा प्रयत्न केला आहे दुसरीकडे स्वच्छ सर्वेक्षणात देखील आयुक्तांनी शहराला चौकाचौकात आकर्षक शिल्पांची भेट देत शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. मात्र स्वच्छ सर्वेक्षणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आयुक्तांना मात्र शहरातील रस्ते मात्र सुधारता आलेले नाहीत.

  अभियंता विभागाकडून सातत्याने आयुक्तांच्या डोळ्यांत धूळफेक जरी सुरू असली तरी आयुक्तांना शहरात जाता येता रस्ते दिसू नयेत? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. या अधिकृत भ्रष्टाचाराला आयुक्त बांगर हे आपल्या कारकिर्दीत आवर घालून नवी मुंबईला गुळगुळीत रस्ते देतात का? हे पाहावे लागणार आहे.

  स्वच्छ ससर्वेक्षणातच नागरिकांची आठवण

  पालिकेला जिथे नामांकन उंचवायचे असते त्या ठिकाणी पालिकेला कायम नागरिकांची आठवण येते. स्वच्छ सर्वेक्षणात पालिका कायम नागरिकांना सहकार्य करण्याचे आव्हान  करते. मात्र नागरिकांना पालिकेकडून मात्र रस्त्यांसारख्या मूलभूत असुविधांसाठी बोटे मोडावी लागत असल्याने विरोधाभासाचे चित्र दिसून येत आहे. मुख्यम्हणजे पालिका मुख्यालयाजवळचा रस्ता गुळगुळीत बांधलेला आहे. असा दर्जा संपूर्ण शहरात  का दिसत नाही असा सवाल विचारण्यात येत आहे.

  संपूर्ण शहरातच काँक्रीटीकरण करावे अशी मागणी वाढत चालली आहे. एकदाच काय तो खर्च करा नी या खड्डे व खड्डे बुजवून ओबडधोबड पॅचेस मारलेल्या रस्त्यांमधून सुटका करा अशी मागणी नवी मुंबईकर करू लागले आहेत. संपूर्ण शहरात काँक्रीटीकरण करून खऱ्या अर्थाने नागरिकांना आधुनिक शहराचा चेहरा आयुक्तांनी दाखवावा. सिवूडमध्ये तर खड्डे पेव्हर ब्लॉकनी बुजवलेले असून विचित्र अवस्था रस्त्यांची झालेली आहे.

  तृप्ती कर्णिक नागरिक ,सिवूड

  जुईनगर येथील रस्ता संपूर्ण खरवडलेला आहे. बाईकरून जाताना तोल जातो. आता पाऊस थांबला असून पालिका गणेशोत्सव असल्याने तात्पुरती मलमपट्टी करेल. मात्र कायमस्वरूपी चांगले रस्ते पालिका का देऊ शकत नाही.

  समीर पांचाळ नागरिक, जुईनगर