वाढीव वीज बिलाबाबत रिपाइं युवक आघाडीची महावितरणला धडक – जास्त बिलाची आकारणी थांबविण्याची मागणी

कल्याण : कोरोना महामारीमुळे २० मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने जनता आर्थिक अडचणीत असतांना महावितरणच्या वतीने नागरिकांना अव्वाच्या सव्वा अंदाजे बिल देण्यात येत आहे. याचा जाब

 कल्याण : कोरोना महामारीमुळे २० मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने जनता आर्थिक अडचणीत असतांना महावितरणच्या वतीने नागरिकांना अव्वाच्या सव्वा अंदाजे बिल देण्यात येत आहे. याचा जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या युवक आघाडीच्या शिष्ट मंडळाने महावितरणच्या तेजश्री या कार्यालयावर धडक देत वापरापेक्षा जास्त बिलाची आकारणी थांबविण्याची मागणी केली.

लॉकडाऊन काळात महावितरणने नागरिकांना भरमसाठ वीजबिलं पाठवली असून हि वीजबिलं भरायची कशी असा सवाल नागरिकांना पडला आहे. याबाबत कल्याण मधील रिपाइंच्या युवक आघाडीने महावितरणच्या तेजश्री या कार्यालयावर धडक देत सुरु असलेल्या गलथान कारभाराचा जाब विचारला. तर ज्या नागरिकांना वाढीव वीज बिल आले आहेत ते कमी करून देण्याचे आश्वासन महावितरणने दिले आहे.
 
यावेळी रिपाइंच्या पदाधिकार्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुरु असलेल्या गलथान कारभाराचा जाब विचारत नागरिकांची सद्धपरिस्थिती मांडली. तसेच ज्या नागरिकांना जास्त बिलं पाठवली आहेत ती त्वरित कमी करून देण्याची मागणी केली. बिल कमी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. त्याचप्रमाणे या शिष्टमंडळाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांची भेट घेत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, धारावी प्रमाणे येथील झोपडपट्टी मधील सार्वजनिक शौचालयांची जंतूनाशक फवारणी करून स्वच्छता करण्याची मागणी केली. यावेळी रिपाइंचे जेष्ठ नेते अण्णा रोकडे, माजी नगरसेवक भीमराव डोळस, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संग्राम मोरे, शहर अध्यक्ष संतोष जाधव, बाळा बनकर, कुमार कांबळे, विकास आहिरे, विशाल शेजवळ, शिवाजी निकम, प्रवीण भंगारे, सागर शिंदे, गणेश कांबळे आदी  पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.