आयुक्तांकरिता राजेशाही थाट ! ठाणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण

महापलिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना आयुक्तांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. याबाबत आयुक्तांवर आणि महापालिकेच्या उधळपट्टीवर टीका झाली. मनसे विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी यावरून आयुक्तांवर टीकास्त्र सोडले.

    ठाणे : ठाणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करून स्विमिंग पूल बांधला आहे. सर्वसामान्य कोरोनामुळे टाचा घासून मरत असताना आयुक्तांकरिता हा राजेशाही थाट कशाला हवा, असा सवाल केला जात आहे.

    नूतनीकरणाकरिता केवळ ५० लाख रुपयांची निविदा मागवल्याचे भासवले गेले. प्रत्यक्षात हा खर्च ‘वाढता वाढता वाढे’ यानुसार दोन कोटींवर गेला. विद्यमान आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी या खर्चाबाबत कानावर हात ठेवले असून, विजय सिंघल हे अल्पावधीकरिता आयुक्त असताना त्यांनी नूतनीकरणाचा हा निर्णय घेतल्याचा दावा केला आहे.

    महापलिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना आयुक्तांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. याबाबत आयुक्तांवर आणि महापालिकेच्या उधळपट्टीवर टीका झाली. मनसे विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी यावरून आयुक्तांवर टीकास्त्र सोडले.

    आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची अलीकडेच पाचंगे यांनी भेट घेतली. त्यावेळी नूतनीकरणाचा निर्णय माझ्या कार्यकाळात झाला नसून, माझ्या आधीच्या आयुक्तांच्या म्हणजे विजय सिंघल यांच्या काळात झाला असून, त्याची माहिती लेखी स्वरूपात दिली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.