महसूल विभागाची जमीन उत्खननास नियमबाह्य परवानगी – उपवनसंरक्षक अधिकाऱ्यांचे कारवाईचे संकेत

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील पवाळे हद्दीत मुरबाड तहसीलदारांनी चक्क महसूल खात्याच्या जागेत उत्खनन करण्यास परवानगी दिली आहे. गेल्या चार महिन्यांपासून येथे हजारो ब्रास मातीचे उत्खनन सुरू असुन महसूल

 मुरबाड : मुरबाड तालुक्यातील पवाळे हद्दीत मुरबाड तहसीलदारांनी चक्क महसूल खात्याच्या जागेत उत्खनन करण्यास परवानगी दिली आहे. गेल्या चार महिन्यांपासून येथे हजारो ब्रास मातीचे उत्खनन सुरू असुन महसूल खात्याच्या जागेत महसूल खात्यानेच उत्खनन करण्यास परवानगी दिल्याने मातीचोरांना मोकळे रान मिळाले आहे.

तालुक्यातील पवाळे हद्दीतील नानकसवाडी येथे वनखात्याने बरीचशी जमीन महसूल खात्याला वर्ग केली आहे. यातील काही जमीन ही महसूल खात्याने भूमीहीन आदिवासींना कसण्यासाठी दिली आहे. मात्र येथे एका विकासकाने रस्त्याच्या भरावासाठी या जमिनीत उत्खनन सुरू केले आहे.येथील सर्व्हे नंबर १५१/३ मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. ही जमीन वनखात्याने महसूल विभागाला वर्ग केली असुन महसूल विभागाने ही जमीन केवळ कसून खाण्यासाठी येथील भूमीहीनांना दिली आहे. मात्र असे असताना महसूल विभागानेच या जमिनीत उत्खनन करण्यासाठी नियमबाह्य परवानगी दिली आहे. याबाबत वनविभागाने या उत्खननाचा पंचनामा करून अहवाल मुरबाड तहसीलदारांकडे सादर केल्यानंतर हे उत्खनन बंद झाले. मात्र आता पुन्हा हे उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे.याबाबत सामजिक कार्यकर्ते आण्णा साळवे यांनी उपविभागीय अधिकारी कल्याण यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.याबाबत साळवे यांनी उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनाही कळवले असुन याबाबत चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले आहे.