महसूल खात्याच्या जागेत उत्खनन करून हजारो ब्रास मातीचोरी

मुरबाड: मुरबाड तालुक्यातील पवाळे हद्दीतील नानकसवाडीजवळ महसूल खात्याच्या जागेत उत्खनन करून हजारो ब्रास मातीची चोरी सुरू आहे.याबाबत मुरबाड तहसीलदारांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली

 मुरबाड: मुरबाड तालुक्यातील पवाळे हद्दीतील नानकसवाडीजवळ महसूल खात्याच्या जागेत उत्खनन करून हजारो ब्रास मातीची चोरी सुरू आहे.याबाबत मुरबाड तहसीलदारांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील पवाळे हद्दीतील नानकसवाडी येथे वनखात्याने बरीचशी जमीन महसूलखात्याला वर्ग केली आहे.यातील काही जमीन ही महसूलखात्याने भूमीहीन आदिवासींना कसण्यासाठी दिली आहे.मात्र येथे एका विकासकाने रस्त्याच्या भरावासाठी या जमिनीत उत्खनन करून मातीची चोरी सुरू केली आहे.

याबाबत वनविभागाने या उत्खननाचा पंचनामा करून अहवाल मुरबाड तहसीलदारांकडे सादर केला केल्यानंतर हे उत्खनन बंद झाले. मात्र आता पुन्हा रात्रीच्या अंधारात हे उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे.याबाबत तहसीलदार कार्यालयाशी संपर्क केला असता या उत्खननाची रॉयल्टी भरून कायदेशीर परवानगी घेतली असल्याचे उत्तर महसूल विभागाने दिले. मात्र आदिवासी नवीन शर्त जागेवर उत्खनन करण्याची परवानगी दिली गेलीच कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.याबाबत सामजिक कार्यकर्ते आण्णा साळवे यांनी चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. हा प्रकार मंडळ अधिकारी आणि मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या संगनमताने सुरू असल्याचा आरोप साळवे यांनी केला आहे.