कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीकडून सॅनिटाईज रिक्षाचा पर्याय

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असून आगामी काळात काही दिवसांत सार्वजनिक वाहतूक सुरु होण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. अशावेळी प्रवाशांना सावर्जनिक

 कल्याण :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असून आगामी काळात काही दिवसांत सार्वजनिक वाहतूक सुरु होण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. अशावेळी प्रवाशांना सावर्जनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतने सॅनिटाईज रिक्षाचा पर्याय पुढे आणला असून यामध्ये रिक्षा चालक आणि २ प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.

संपूर्ण देशात कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सर्व वाहतुकी बरोबरच रिक्षा वाहतूकही बंद आहे. त्यामूळे रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. मात्र किती काळ हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा समोर असलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याच्या उद्देशाने कल्याणमधील गफूर शेखने ही अनोखी रिक्षा बनवली आहे. कोरोनाचा धोका असल्याने रिक्षा प्रवासावर बंदी असल्याचे लक्षात घेऊन सुरक्षित रिक्षा
प्रवासासाठी त्याने आपल्या रिक्षेमध्ये खास असे सॅनिटायजरचे फवारे बसवले आहेत. विशेष म्हणजे सोशल डिस्टन्स पाळून दोन प्रवासी बसण्याच्या ठिकाणी हे सॅनिटायजरचे फवारे लावण्यात आले आहेत. तर मास्क असेल तरच रिक्षात बसता येणार असून रिक्षामध्ये बसण्यापूर्वी हाताला सॅनिटायजर लावूनच रिक्षामध्ये प्रवेश दिला जात आहे. पैसे घेण्यासाठी पेटीएमची सुविधा उपलब्ध करून  देण्यात आली आहे. जेणेकरून प्रवासी आणि रिक्षाचालकामध्ये कमीत कमी संपर्क येईल आणि कोरोनाचा धोकाही टळू शकेल अशी माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे राज्य सचिव शिवाजी गोरे यांनी दिली.  दरम्यान आर.टी.ओ. अधिकाऱ्यांनीदेखील या रिक्षाची पाहणी केली असून या रिक्क्षाचे कौतुक करत इतर रिक्षा चालकांनी देखील अशाप्रकारे रिक्षामध्ये परिवर्तन केल्यास नागरिकांना रिक्षा प्रवासाची भीती वाटणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.