कारवाईसाठी सशस्त्र पोलिस बंदोबस्त दया, पालिका प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

प्रशासनकडून अनधिकृत बांधकामावर, फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिसांकडून संरक्षण घेतले जाते. मात्र, प्रत्यक्षात सुरक्षेसाठी निशस्त्र पोलिस बल पुरविले जात असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वत:च्या सुरक्षेची काळजी वाटू लागली आहे.

    ठाणे येथे फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पीता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांनी प्राणघातक हल्ला केला. या घटननंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कारवाई संदर्भात भीतीचे वातावरण आहे.

    प्रशासनकडून अनधिकृत बांधकामावर, फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिसांकडून संरक्षण घेतले जाते. मात्र, प्रत्यक्षात सुरक्षेसाठी निशस्त्र पोलिस बल पुरविले जात असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वत:च्या सुरक्षेची काळजी वाटू लागली आहे. कारवाईसाठी सशस्त्र पोलीस बल पुरविले जावे अशी मागणी घेत कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे सर्व प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले आहे.

    कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून दरमहा ४० लाख रुपये मोजून शहरातील फेरीवाला आणि अनधिकृत बांधकामावरील कारवाईसाठी पोलिस दल नियुक्त केले जातात. पोलिस कर्मचारी पालिका मुख्यालयासह प्रभाग क्षेत्र कार्यालयाबाहेर आदेशाची प्रतीक्षा करत कार्यालयीन वेळेत हजर असतात. आदेश मिळताच हे पथक कारवाईसाठी रवाना होते.

    मात्र, या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातात असते ती केवळ लाठी. या लाठीच्या मदतीने कारवाईस विरोध करणाऱ्या नागरिकांना आवरणे अनेकदा कठीण होते. जेव्हा मोठ्या प्रमाणावर विरोध होतो तेव्हा या पथकाकडून स्थानिक पोलीस स्टेशनला कॉल देत मदत मागितली जाते. नंतर सशस्त्र पोलीस फाटा पाठवला जातो. या दरम्यान कर्मचाऱ्यांना मारहाण होण्याचे प्रकार घडत असल्याने कर्मचारी कारवाई करण्यास कचरतात. यामुळे फेरीवाल्यावर किंवा अनधिकृत बांधकामांना कर्मचारी आणि अधिकारी पाठीशी घालत असल्याची ओरड होते.

    त्यामुळे कारवाई पथकाबरोबर सशस्त्र पोलीस फाटा असेल तर कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढून त्यांना सुरक्षेची हमी मिळेल आणि कर्मचारी अधिक समर्थपणे कारवाई करू शकतील. अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. ठाण्यातील सहाय्यक आयुक्तावर झालेल्या हल्ल्यानंतर अधिकारी कर्मचारी कमालीचे धास्तावले असून आज कल्याण डोंबिवली महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी सशस्त्र पोलीस बल उपलब्ध करून देण्याचे निवेदन आयुक्त विजय सूर्यवंशी यांना दिले आहे.