कसारा रेल्वे पोलिसांकडून अटक करण्यात आलेले हेच ते आरोपी तरुण
कसारा रेल्वे पोलिसांकडून अटक करण्यात आलेले हेच ते आरोपी तरुण

लोकलमध्ये प्रवास करणारी एकटी-दुकटी तरुणी पाहून त्या दोघांची वासना जागी झाली. तिला पाहून त्यांचे नको ते चाळे सुरू झाले. सुरुवातीला ती तरुणी घाबरली; मात्र तिने स्वतःला सांभाळत त्या तरुणांचा प्रतिकार करणे सुरू केले. अखेर तिने या दोन्ही विकृतांचे फोटो काढून नातेवाईकांना पाठविले आणि तातडीने मदत मागितली. कसारा रेल्वे स्थानकावर लोकल गाडी येऊन धडकताच दोघांपैकी एकाला अटक करण्यात आली. तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी ठरला; परंतु पोलिसांनी त्यालाही शिताफीने अटक केली.

  • तरुणीवर अतिप्रसंग करून तिला धावत्या लोकलमधून फेकण्याचा होता कट
  • रेल्वे प्रवासात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कल्याण : मध्य रेल्वेच्या आटगाव कसारा स्टेशन दरम्यान धावत्या लोकलमध्ये दारूच्या नशेमध्ये तर्र असणाऱ्या दोन तरूण तळीरामांनी छेडछाड करीत विनयभंग करून या तरुणीला चालत्या ट्रेनमधून फेकून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी साडेदहाच्या सुमारास घडला. पिडीत तरूणीने प्रसंगावधन दाखवित धर्याने प्रतिकार करीत बचाव केला. पिडित तरुणीनी आपला बचाव करीत कसारा स्थानकात लोकल येईपर्यंत आरोपी तरूणांशी प्रतिकार केला.

कसारा येथे राहणारी एक २१ वर्षीय तरुणी ठाण्यातील एका मॉलमध्ये मोठ्या पदावर कामाला आहे. ही तरुणी दररोज कसारा ते ठाणे दरम्यान लोकल ट्रेनने प्रवास करते. २५ नोव्हेंबर रोजी रात्री ही तरुणी साडेनऊच्या सुमारास ठाण्याहून लोकल ट्रेनच्या महिला डब्यात बसली. या डब्यात अन्य प्रवासी महिला होत्या. ही ट्रेन आठगाव स्थानक गाठेर्पयत रिकामी झाली होती. डब्यात केवळ ही तरुणी एकटीच होती. आठगाव स्थानक ही लोकल ट्रेन सोडत असतांना दोन तरुण धावत्या ट्रेनमध्ये चढले. दोघेही दारुच्या नशेत तर्र होते. या दोघांचे हावभाव पाहून तरुणी घाबरली होती. तिने लगेच तिच्या मोबाईलवर दोघांचे फोटो काढले. हे फोटो तिने तिच्या नातेवाईकांना तातडीने पाठविले.

या दरम्यान या दोघांनी तरुणीचा विनयभंग केला. तरुणी शेवटपर्यंत प्रतिकार करीत होती. या झटापटीत तिला चालत्या ट्रेनमधून फेकून देण्याचा प्रयत्न झाला. तोपर्यत लोकल ट्रेन कसारा स्थानकात पोहचली होती. आरोपी पैकी एक तरुण चालत्या लोकल ट्रेन मधून उतरत पसार झाला. मात्र दुसऱ्या आरोपी तरूणास कसारा स्थानकात पिडीत तरुणीचा नातेवाईक जो कसारा स्थानकात येऊन थांबला होता. त्याने व रेल्वे पोलिसांनी त्याला पकडले. तर दुसऱ्या आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली.

आरोपी अमोल जाधव आणि अमन हिले हे दोघे ठाण्याला एका कंपनीत कामाला आहेत. वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरूल यांनी सांगितले की, या दोन्ही आरोपींच्या विरोधात ३क७, ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांनी घाबरण्याची गरज नाही. एखाद्या लोकल ट्रेनच्या महिल्या डब्यात कोणी नसेल तर त्यांनी पुरुषांच्या डब्यातून प्रवास केला पाहिजे. आम्ही सर्व ठिकाणी गस्त वाढविली आहे. या दोघांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरु आहे. पुढील तपास गुन्हे निरिक्षक योगेश देवरे करीत आहे.

के ३रेल्वे प्रवासी संघटनेच्या वाशिंद रेल्वे स्थानक सदस्या काजल पगारे यांनी पिडीत तरूणीच्या धैर्याचे व प्रसंगावधानाचे कौतुक करीत रेल्वे प्रशासनाने महिला डब्यासाठी पोलीस कर्मचारी ठेवणे बंधनकारक असताना देखील पोलीस कर्मचारी नसल्याने हा प्रसंग ओढावला आहे. रेल्वे प्रवासात महिला सुरक्षा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आतातरी महिला डब्यात पोलीस कर्मचारी तसेच रेल्वे स्थानकात महिला डब्बा जिथे थांबतो तेथे पोलीस कर्मचारी लोकल टे्न येण्यापूर्वी तैनात ठेवावे जेणे करून अशा अपप्रवृत्ती असणाऱ्यावर अंकुश राहील