
ठाणे : शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला अपघात झाला. सुदैवाने एकनाथ शिंदे या अपघातातून असून त्यांना किरकोळ दुखापत झाली. जादूटोण्याच्या प्रकारामुळे हा अपघात झाल्याचा दावा केला जात आहे.
गुरुवारी २४ डिसेंबर रोजी नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर हा अपघात झाला. यात एकनाथ शिंदे यांच्या टोयटा एसयुव्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात शिंदे यांच्या अंगठ्याला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती उत्तम आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पालघरमधील विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात एकनाथ शिंदे यांच्या फोटोसमोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करून अघोरी जादूटोणा करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली.
एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याचे हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला होता. यामुळेच हा अपघात झाल्याचा दावा केला जात आहे.
‘अशा अघोरी घटना होतात त्यावर विश्वास ठेवायची गरज नाही. अशा प्रवृत्ती आहेत त्यावर पोलिसांमार्फंत कारवाई केली आहे. अशा कृत्याने कोणतीही गोष्ट घडत नसते, समाजाला अशा पासून सावध राहिले पाहिजे’ असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.