
अनेक महिन्यांपासून रखडलेले महापालिकेच्या दर्शनी भागावर असणारे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे शिल्पचित्र आता ठाणेकरांना नव्या स्वरुपात पाहायला मिळणार आहे. हे शिल्पचित्र पुढच्या वर्षी म्हणजेच २०२१ च्या मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाहायला मिळणार असल्याचे ठाणे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.
ठाणे :ठाणे महापालिकेच्या(thane corporation) दर्शनी भागावर नव्याने लावण्यात येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पचित्राला (shivrajyabhishek painting) २०२१ उजाडणार आहे. या शिल्पचित्राचे मॉडेलचे सादरीकरण आज महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात संपन्न झाले. यावेळी महापौर नरेश म्हस्के यांनी याविषयी माहिती दिली. यावेळी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, उपमहापौर पल्लवी कदम,स्थायी समिती सभापती संजय भोईर,राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला, भाजपचे गटनेते संजय वाघुले यांच्यासह अनेक पदाधिकारी शिल्पचित्राचे सादरीकरण पाहण्यासाठी उपस्थित होते.
अनेक महिन्यांपासून रखडलेले महापालिकेच्या दर्शनी भागावर असणारे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे शिल्पचित्र आता ठाणेकरांना नव्या स्वरुपात पाहायला मिळणार आहे. हे शिल्पचित्र पुढच्या वर्षी म्हणजेच २०२१ च्या मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाहायला मिळणार असल्याचे यावेळी म्हस्के यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी यासाठी ठाणे महापालिका मुख्यालयाच्या दर्शनी भागावर शिवराज्याभिषेकाचे शिल्प बसविण्यात आले आहे. मात्र हे शिल्प २५ वर्षे जुने असल्याने बहुतांशी जीर्ण झाले होते. यासाठी सर्व स्तरातून हे शिल्प नव्याने बसविण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यासाठी गेल्या वर्षभर प्रशासनासोबत बैठका घेवून या शिल्पाबाबत महापौरांनी पाठपुरावा केला आहे.
अत्यंत आकर्षक स्वरुपात हे भव्य दिव्य शिल्प साकारण्यात येत असून यामध्ये कोणाशी स्पर्धा करण्याचा हेतू नाही. नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याची माहिती व्हावी या उदात्त हेतूने हे शिल्प बसविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात असे देखणे शिल्प साकारणारी ठाणे ही पहिलीच महापालिका असेल असा विश्वास महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी व्यक्त केला.
शिल्पचित्राचे मॉडेल राज्यात नव्हे तर देशात एक क्रमांकाचे असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति सर्वांचा आदर असून शिल्पचित्राच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात होणार आहे. दरम्यान शिल्पचित्राच्या कामात कोणत्याही उणिवा ठेवू नका अशी सूचना यावेळी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केली.