भिवंडीहून गोरखपूरला जाणाऱ्या श्रमिक ट्रेनचे बुकिंग फुल ; इतर शहरातील मजुरांनी भिवंडीत न येण्याचे पोलिसांचे आवाहन

भिवंडी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभर लॉकडाऊन आहे. मात्र यामुळे यंत्रमाग कामगारांसह रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात अनेक कामगारांनी

 भिवंडी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभर लॉकडाऊन आहे. मात्र यामुळे यंत्रमाग कामगारांसह रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात अनेक कामगारांनी पायपिट करत आपल्या मूळगावी जाण्याचा रस्ता धरला होता. शुक्रवारी १४  दिवसांचा लॉकडाऊन वाढल्यानंतर भिवंडीतील परप्रांतीय कामगारांसाठी भिवंडी रोड रेल्वे स्टेशन ते गोरखपूर अशा विशेष श्रमिक ट्रेनची व्यवस्था रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली असून यासाठी पोलिसांनी नागरिकांच्या थांबण्यासाठी सोशल डिस्टनसिंगचे पालन करून चोख व्यवस्था केली होती. भोईवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मजुरांसाठी टावरे स्टेडियम , भिवंडी शहर पोलीस स्टेशन अंतर्गत मजूर मानसरोवर , निजामपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत मजूर एसटी स्टँड , तर शांती नगर पोलीस स्टेशन अंतर्गत मजूरांना भादवड येथील संपदा नाईक हॉल तर नारपोली पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या मजुरांना अंजुरफाटा येथील हरी धारा इमारत येथे तसेच कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतील मजुरांना कोनगाव पंचक्रोशी मैदान कोनगाव येथे बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान मजुरांनी सर्वच ठिकाणी एकच गर्दी केल्याने १२०० सीटची ही विशेष श्रमिक ट्रेन अवघ्या काही वेळातच फुल झाली आहे. ही ट्रेन आज भिवंडी रेल्वे स्टेशन येथून सायंकाळी ७ च्या सुमारास सुटणार होती, मात्र प्रवाशांची वैद्यकीय चाचणी, ओळखपत्र  वगैरे पेपर तपासणीस उशीर होणार असल्याने ही ट्रेन सुटण्यास रात्री उशिरा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान आता ट्रेन बुकिंग फुल झाली असून नागरिकांनी शहरात गर्दी करू नये अन्यथा संचारबंदी कायद्यानुसार कारवाई करावी लागेल, असे आवाहन भिवंडी पोलीस प्रशासनाने शहरवासीयांसह परप्रांतीय मजुरांना केले आहे.