श्रमजीवी संघटनेच्या आधुनिक संघटना बांधणी तंत्र शिबिराचे आयोजन

भिवंडी: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन स्थिती निर्माण झाली आहे. मात्र या काळात सर्वत्र बंद स्थिती असतानादेखील श्रमजीवी संघटनेने गोरगरीब , आदिवासी जनतेच्या हितासाठी

 भिवंडी: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन स्थिती निर्माण झाली आहे. मात्र या काळात सर्वत्र बंद स्थिती असतानादेखील श्रमजीवी संघटनेने  गोरगरीब , आदिवासी जनतेच्या हितासाठी काम दुप्पट वेगाने सुरू ठेवले आहे. झूम अॅप्लिकेशनचा वापर करून श्रमजीवीने केलेले आंदोलन या काळात लक्षवेधी ठरले आता झूमवर सात दिवसांचे ऑनलाईन संघटक प्रशिक्षण शिबीर आयोजित करून श्रमजीवीने आधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत नियोजनबद्धपणे उपयोग कसा करता येतो ? हे दाखवून दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  २१ ते २७ जून दरम्यान या शिबिराचे आयोजन उसगांव येथील श्रमजीवी संघटनेच्या मुख्य कार्यालयात करण्यात आले आहे.या शिबिराचे उद्घाटन निवृत्त पोलीस अतिरिक्त महासंचालक-महाराष्ट्र राज्य  टी. के.चौधरी यांच्या हस्ते होणार असून अनेक मान्यवर अधिकारी, विचारवंत या शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराच्या समारोपीय सत्रात निवृत्त मुख्यसचिव महाराष्ट्र राज्य-व्ही.रंगनाथन आणि महारेराचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा निवृत्त अति.मुख्यसचिव गौतम चॅटर्जी हे मार्गदर्शन करणार आहेत. सूत्रसंचालन मुंबई उच्च न्यायालयाचे अॅड.वैभव भुरे करणार आहेत.

या शिबिरात ठाणे,पालघर,रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील शिबिरार्थी म्हणून सहभागी होऊन प्रशिक्षण घेणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे.प्रत्यक्ष एकत्र येता येत नसल्याने सर्व बैठका, शिबीर, कार्यक्रम , सभा सर्वकाही ठप्प आहे. कोणताही राजकीय, सामाजिक कार्यक्रम होताना दिसत नाही. अशा काळात गरीब दुर्बल आदिवासी मजूर भुकेने व्याकुळ झालेले असताना श्रमजीवी संघटनेने घरोघरी पोहोचून धान्य आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत.संघटनेने समाज सेवक व दानशूर व्यक्तींनी दिलेल्या देणगीतून तब्बल सव्वातीन कोटी रुपयांचे सामान वाटप केले. याच काळात श्रमजीवीने रेशन हक्कासाठी झूम अॅप्लिकेशनची मदत घेऊन १९ हजारपेक्षा अधिक रेशनकार्ड अर्ज भरले तर आवश्यक होते त्याकाळात राज्यव्यापी आंदोलन उभारले. एकूणच श्रमजीवीने तंत्रज्ञानाचा वापर करून अभिनव संघटना बांधणीचे एक नवे उदाहरण उभे करून दाखवले आहे.

विवेक पंडित आणि विद्युलता पंडित या शिबिरात सर्व दिवस सहभागी असतील तसेच डहाणूचे पोलीस उपअधीक्षक  मंदार धर्माधिकारी , ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील, नाशिक ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर , काशिमिरा पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक  संजय हजारे,  दूर व मुक्त अध्ययन केंद्र,मुंबई विद्यापीठाचे प्रा.भूषण ठाकर, डॉ.अशोक येंदे , संगीता कोपर्डे, प्रज्ञा सावरगावकर, माधवी चावला, श्रीधर गालीपिली (तहसीलदार विक्रमगड) , समीर वठारकर (गटविकास अधिकारी जव्हार) ,अशोक पाटील (उपमुख्य कार्यकारी अधिकारी,(ग्रा.प. जि. प.ठाणे) आदी मान्यवर विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. पोलीस, मुंबई पोलीस अॅक्ट, दंड प्रक्रिया संहिता,भारतीय राज्य घटना, मुलभूत अधिकार, संघटना इतिहास, संघटना बांधणी, अहिंसक संघर्षाचे डावपेच, रोहयो, पेसा , स्वतंत्र भारताचा इतिहास इत्यादी विषयावर या शिबिरात प्रशिक्षण दिले जाणार आहे. संघटनेच्या बांधणीचा उत्कृष्ट नमुना श्रमजीवीच्या या अभिनव तंत्रस्नेही शिबिराच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे.याबाबत आगाऊ नोंदणी करून त्याचे व्हॉट्स अॅप ग्रुप तयार करून, नोंदणीकृत शिबिरार्थीच्या मोबाईलवर झूम अॅप्लिकेशन लिंक पाठवून शिबिराचे पुर्ण नियोजन केले असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी दिली आहे.