रेशनकार्ड प्रक्रियेतील उपविभागीय अधिकारी अर्चना कदम आणि वाडा तहसीलदार उद्धव कदम यांच्या कामाचे श्रमजीवी संघटनेने केले कौतुक

वाडा: लॉकडाऊन काळात गरीब आदिवासींवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली सातत्यपूर्ण काम सुरू आहे. तसेच २६ मे पासून प्रत्येक तहसील कार्यालयासमोर

वाडा: लॉकडाऊन काळात गरीब आदिवासींवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली सातत्यपूर्ण काम सुरू आहे. तसेच २६ मे पासून प्रत्येक तहसील कार्यालयासमोर ‘हक्काग्रह’ सुरू असून दाखल केलेल्या मागणी अर्जाच्या आधारावर तातडीने रेशनकार्ड मिळावे यासाठी रोज ५० – ५० आदिवासी बांधव रस्त्यावर आहेत. याकाळात कुठे अधिकारी सकारात्मक आहेत तर कुठे नाही, मात्र याकाळात संघर्षाच्या भूमिकेत असलेल्या श्रमजीवी संघटनेने उपविभागीय अधिकारी अर्चना कदम आणि वाडा तहसीलदार उद्धव कदम यांनी रेशनकार्ड बाबत अवलंबलेली कार्यपद्धती आणि संवेदनशीलता कौतुकास्पद असल्याचे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनुभवले. याबद्दल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच स्वतः विवेक पंडित यांनी देखील या दोनही अधिकाऱ्यांचे कौतुक केले. 

 उपविभागीय अधिकारी अर्चना कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कामाने या आंदोलनच्या स्थितीतही संघटना अधिकाऱ्यांचे कौतुक करताना दिसत आहे. ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालयात संघटनेच्या माध्यमातून १८ हजारपेक्षा जास्त रेशनकार्डसाठीचे अर्ज दाखल केले आहेत. यापैकी चार जिल्ह्यात फक्त सुमारे १२०० रेशनकार्ड मिळाले आहेत, अनेक ठिकाणी अधिकारी वरिष्ठांचा आदेश नाही, कागदपत्रे नाही असे कारण देतात, मुळात न्यायालयाने दिलेले आदेश आणि सरकारने दाखल केलेल्या हमीपत्रानुसार तातडीने रेशनकार्ड द्यायला हवे होते मात्र तसे झाले नाही. यासाठी संघटनेचा संघर्ष सुरू आहे. मात्र यात अपवाद असा की वाडा तहसीलदार यांनी या रेशनकार्ड अर्ज मागणीनंतर घेतलेली भूमिका अत्यंत सकारात्मक होती. रेशनकार्ड अर्ज येताच कदम यांनी पहिल्यांदा विभागणी करून अंत्योदय, प्राधान्य, केशरी सर्व कार्डाची प्रकरणे वेग वेगळी करत त्यानुसार जबाबदाऱ्या देत काम सुरू केले. सर्व तलाठी, मंडळ  अधिकारी यांना याबाबत युद्धपातळीवर काम करायला लावले, कागदपत्रे आणि आवश्यक औपचारिकता पूर्ण करताना अर्जदारांना वेठीस न धरता कदम यांनी अधिकारी आणि प्रशासनाच्या टीमकडून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करून घेतले. 

 गरिबांच्या प्रश्नांसाठी हक्काग्रह करणाऱ्या आंदोलकांच्या बाबतीतही उपविभागीय अधिकारी अर्चना कदम आणि तहसीलदार उद्धव कदम यांनी सुरुवातीपासून संवेदनशीलता दाखवत रोज आंदोलनाच्या सांगतेच्या वेळी कदम यांनी १०० ते १२५ कार्ड तयार करून देत आतापर्यंतच्या दाखल केलेल्या १४०६ प्रकारणांपैकी ४६० कार्ड तयार करुन ते त्यांनी लोकांना सुपूर्द केल्याची माहिती सरचिटणीस विजय जाधव यांनी देत कदम यांच्या या सकारात्मक भूमिकेचे कौतुक करत आभार व्यक्त केले. आवश्यक तेथे संघर्ष करतानाच चांगल्या सकारात्मक कामाचे उघडपणे कौतुक करण्याची संघटनेची परंपरा असल्याचे सांगत विजय जाधव यांनी श्रमजीवी संघटनेच्या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्येही वाडा तालुक्यात झालेल्या कामाबाबत माहिती दिल्यानंतर संस्थापक विवेक पंडित यांनीही या दोन्ही अधिकाऱ्यांचे कौतुक करत, स्वतः फोन करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच विक्रमगड श्रीधर गालीपिल्ली हे देखील असेच काम करीत आहेत, त्यांना वसई येथील कोरोना कामाबाबत जबाबदारी दिल्याने  त्यांच्या कामात खंड पडला होता , मधल्या काळात प्रकृतीही ठीक नव्हती, तरिही स्वतःच्या काळजीला प्राधान्य न देता ते कौतुकास्पद काम करीत आहेत.त्यांचेही पंडित यांनी कौतुक केले.