महावितरण कंपनीचा अजब प्रकार, ग्राहकास १ लाख ४७ हजार २५० रुपये वीजबिल

सध्या कोरोनाच्या परिस्थितीत आर्थिक कुचंबणा होत असून घर कसे चालवायचे ही चिंता असून आता अशा पद्धतीचे विजेचे बिल कसे काय आणि कसे भरणार हा मोठा प्रश्न असून आता सुरवातीचा अंदाजे रू. ४९०००/- हप्ता भरणे सध्याचा काळात त्यांना शक्य नसल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.

डोंबिवली : औद्योगिक विभागात मिलापनगर येथे राहात असलेल्या गौरी गजानन चौधरी या वरिष्ठ ग्राहक महिला यांनी ऑनलाईन वीज बिल (electricity bill ) चेक केले असता त्यांना धक्का बसला. बिलाची रक्कम रुपये एक लाख (lakh) सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नास एवढी आल्याचे त्यांना निदर्शनास आल्याने त्यांना जबर धक्का बसला. त्यांचे पती गजानन चौधरी यांनी महावितरण कार्यालयात जाऊन चौकशी केली असता त्यांना तुमचे बिल बरोबर आहे, तुम्ही तीन समान हप्त्यात भरा असे सांगितले. अशा पद्धतीच्या उत्तरामुळे महावितरणबाबत (MSEDCL) संताप व्यक्त होत आहे.

सध्या कोरोनाच्या परिस्थितीत आर्थिक कुचंबणा होत असून घर कसे चालवायचे ही चिंता असून आता अशा पद्धतीचे विजेचे बिल कसे काय आणि कसे भरणार हा मोठा प्रश्न असून आता सुरवातीचा अंदाजे रू. ४९०००/- हप्ता भरणे सध्याचा काळात त्यांना शक्य नसल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. त्यांनी आपले विद्युत मीटर तपासणी करून घ्यावी अशी अधिकाऱ्यांना विनंती केली आहे. वीज वितरण कंपनीबाबत दुसरी तक्रार म्हणजे मिलापनगर मध्ये राहणारे वरिष्ठ नागरिक अजय देसाई यांनाही या महिन्यात रू. ७०,१४०/- इतके बिल आल्याने तेही चिंतेत आहेत. ते महावितरणच्या कार्यालयात चकरा मारतात पण त्यांनाही तेच उत्तर तीन हप्त्यात वीज बिल भरा असे सांगण्यात येत आहे.

चौधरी आणि देसाई कुटुंबात प्रत्येकी एकूण फक्त तीन व्यक्ती असताना एवढे बिल येणे शक्य नाही असे त्यांचे म्हणणे आहे. जरी हे एकूण सहा महिन्याचे बिल असले तरी सरासरी येणारे ठराविक रक्कमेची बिले त्यांनी आतापर्यंत भरली आहेत. तरी सुध्दा ती देऊनही एवढ्या मोठ्या रक्कमेची वीजबिले आल्याने दोन्ही कुटुंबीय चिंतेत आहेत. आता महानगर पालिकेनेही मालमत्ता करांची वाढीव बिले पाठविलेली आहेत. त्यामुळे बिले भरण्यातच पैसे जाणार असल्याने यापुढे घरखर्च कसा चालवावा असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

काही दिवसांपूर्वी कल्याण मधील आमदाराचे लाखो रुपयांचे बिल महावितरणने कमी केल्याची चर्चा असून आमचे मध्यमवर्गीय कुटुंबाचे वीजबिल कमी करावे अशी मागणी वीज ग्राहक करीत आहेत.