Subway closed, potholes everywhere; How to travel by flyover?

    बदलापूर: जोरदार पाऊस, सब-वे बंद आणि त्यात खड्डयांचे साम्राज्य यामुळे बदलापूरच्या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. रविवारनंतर सोमवारीही बदलापूरच्या उड्डाणपुलावर ही वाहतूक कोंडी होत असल्याचे व त्यामुळे वाहनचालक पुरते हैराण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

    बदलापूर शहराच्या पूर्व -पश्चिम भागात ये-जा करण्यासाठी वाहन चालकांना नगर परिषद कार्यालयाजवळील उड्डाणपूल हा एकमेव पर्याय आहे. पूर्वी बदलापूर रेल्वे स्टेशन फाटक, बेलवली रेल्वे फाटक सुरू होते. सध्याच्या उड्डाणपुलाजवळुन जाणारा एक सबवेही सुरू होता. उड्डाणपुलाची उभारणी झाल्यानंतर ही दोन्ही रेल्वे फाटक बंद करण्यात आली. उड्डाणपुलाजवळचा सबवे अरुंद असल्याने दुचाकी व रिक्षा यानंच त्याचा उपयोग होतो.

    बेलवली येथील सबवे मध्ये नेहमी पाणी साचत असते.मात्र पाणी कमी असल्यावर वा नसल्यावर वाहनचालक शहराच्या पूर्व-पश्चिम भागात ये-जा करण्यासाठी या सबवेचा वापर करीत होते. आता जोरदार पावसामुळे बेलवली सबवे पूर्णपणे भरला असल्याने तेथून कोणतीही वाहतूक होऊ शकत नाही. आणि उड्डाणपुलाजवळचा सबवे काही दिवसांपूर्वीच नगर परिषदेने बंद केला आहे. त्यामुळे सध्या शहराच्या पूर्व-पश्चिम भागात जाण्यासाठी वाहनांना उड्डाणपुल हा एकमेव पर्याय आहे.

    गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे बहुतांश लोक शहराच्या पूर्व-पश्चिम भागात ये-जा करण्यासाठी वाहनांचा वापर करीत आहेत. त्यामुळे स्वाभाविकच मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्यावर आल्याने उड्डाणपुलाच्या रस्त्यावर वाहनांची गर्दी होत आहे. त्यातच या उड्डाणपुलावर ठिकठिकाणी लहानमोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे उड्डाणपुलावर वारंवार वाहनकोंडी होत आहे. काही दिवसांपूर्वीच नगर परिषद प्रशासनाने हे खड्डे भरले होते. मात्र हे खड्डे वाहून गेल्याने वाहनचालकांना खड्डेमय रस्त्यावरून चालत उड्डाणपुल पार करावा लागत आहे.