टाटा आमंत्रामध्ये रुग्णांचा जमिनीवर उपचार , सोयी सुविधांची वानवा

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांवर भिवंडी बायपास रांजणोली नाका येथील टाटा आमंत्रा येथे उपचार सुरु असून याठिकाणी रुग्णांवर जमिनीवर उपचार सुरु असल्याचा प्रकार

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांवर भिवंडी बायपास रांजणोली नाका येथील टाटा आमंत्रा येथे उपचार सुरु असून याठिकाणी रुग्णांवर जमिनीवर उपचार सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला असून याठिकाणी सोयी सुविधांची वानवा आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात महापालिका अपयशी ठरत आहे. सत्ताधार्या कडून रुग्णांच्या सोयीसाठी शेकडोंच्या संख्येने बेड्सची व्यवस्था करण्यात आली असल्याचा दावा करण्यात येत असला तरी त्यांचा हा दावा फोल ठरत आहे. कल्याण डोंबिवलीतील रुग्णांवर शास्त्री नगर रुग्णालय, टाटा आमंत्रा तसेच विविध खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र टाटा आमंत्रा या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांना योग्य ते उपचार मिळत नसून सोयी सुविधांची वानवा आहे.

याठिकाणीच्या रुग्णांना बेड्सची व्यवस्था नसून जमिनीवर गादी टाकून उपचार करण्यात येत आहे. तर कोरोना रुग्णांना गरम पाणी पिणे गरजेचे असताना त्याठिकाणी गरम पाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने रुग्णाना गरम पाण्यासाठी मशीन घरून आणण्यासाठी सांगितले जात असून रूममधील स्वच्छतेसाठी झाडू देखील घरून आणायाला सांगितला असल्याचा आरोप येथे गेल्या ५ दिवसांपासून अॅडमिट असलेल्या एका रुग्णाने केला आहे. सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाने आता तरी जागे होऊन या नागरिकांच्या उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करणे आवश्यक आहे. खाजगी रुग्णालये देखील अव्वाच्या सव्वा बिले आकारत आहेत. यावरदेखील प्रशासनाने नियंत्रण ठेवायला हवे.  गरीब जनतेचे दोन वेळच्या जेवणाचे वांदे असतांना पाणी गरम करायचे मशीन आणणार कुठून असा सवाल समाजसेवक अजय सावंत यांनी उपस्थित केला आहे.