ठाणे महापलिकेच्या तिजोरीत करदात्यांनी पाडला पैशांचा पाऊस, तब्बल इतक्या कोटींचा कर जमा

५ लाख १० हजार करदात्यांना देयके अदा करण्यात आल्यानंतर आत्तापर्यंत २ लाख २६ हजार करदात्यांनी देयके भरलेली आहेत. त्यानुसार पालिकेच्या तिजोरीत आजच्या घडीला ३२२.२५ कोटी जमा झाले आहेत यामध्ये ४४.२५ कोटींच्या थकबाकीचाही समावेश आहे.

ठाणे : कोरोना काळात सर्वच महापालिकांवर आर्थिक संकट घोंगावत असतानाही ठाणेकर नागरिकांनी महापालिकेच्या तिजोरीत तब्बल ३२२ कोटींचा मालमत्ता कर जमा केला आहे. यातील ३३ टक्के वाटा माजिवडा मानपाडा प्रभागातील मालमत्ताधारकांनी उचललेला आहे. कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली होती. कोरोना काळातील मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी काही राजकीय नेत्यांनी लावून धरली होती. मात्र असे असतानाही आता महापालिकेच्या तिजोरीत तब्बल ३२२.२५ कोटी जमा झाले आहेत.

कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि महापालिकेच्या तिजोरीवरील मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले होते. मालमत्ता कर तसेच इतर करांचा ही वसुली थांबली होती. त्यामुळे महापालिकेच्या विकासकामांवर देखील परिणाम झाल्याचे दिसून आले होते. महापालिकेच्या तिजोरीत पैसे नसल्याने ठेकेदारांची बिले ही थांबली होती त्यानंतर पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात झाल्यानंतर ठेकेदारांना बिले अदा करण्यात आली. त्यानंतर पाणीपट्टी बिलांची वसुली देखील मागील महिन्यात चांगली झाल्याचे दिसून आले आहे.

मोबाईल व्हॅन, ऑनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देत आल्या होत्या, याशिवाय १५ सप्टेंबर पर्यंत कर जमा केल्यास मालमत्ता कराच्या सामान्य करात १० टक्के सवलत देण्यात आली होती. विशेष म्हणजे कराची वसुली करताना महापालिकेने कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली नाही. तसेच कोणतीही कारवाई अद्याप केलेली नाही, त्यामुळे ठाणेकरांनी देखील पालिकेला साथ दिल्याने महापालिकेतील तिजोरीत कराचा भरणा झाल्याचे दिसून आले.

५ लाख १० हजार करदात्यांना देयके अदा करण्यात आल्यानंतर आत्तापर्यंत २ लाख २६ हजार करदात्यांनी देयके भरलेली आहेत. त्यानुसार पालिकेच्या तिजोरीत आजच्या घडीला ३२२.२५ कोटी जमा झाले आहेत यामध्ये ४४.२५ कोटींच्या थकबाकीचाही समावेश आहे. मागील याच वर्षी ठाणे मनपाची ३५० कोटी वसुली झाली होती. मालमत्ता वसुलीसाठी आणखीन प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.