dance bar

ठाणे महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत एकूण पंधरा लेडीज बार(15 Ladies Bar Sealed By Thane Corporation) सील केले.

    ठाणे: कोरोना नियमांचे(Corona Rules) उल्लंघन करत बार चालवणाऱ्या पंधरा लेडीज बार(ladies Bar Sealed By Thane Corporation) ठाणे महापालिकेने सील केले आहेत. ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अशीच कारवाई सुरू ठेवण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मात्र, पालिकेच्या या कारवाईमुळे ठाण्यातील इतर बारमालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

    सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायजर वापर तसेच इतर साथरोग नियंत्रण अधिनियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत एकूण पंधरा लेडीज बार सील केले. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक असल्याचं पालिकेकडून वारंवार सांगण्यात आलं आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांना तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती निहाय महापालिकेच्या पथकाद्वारे धाडी टाकून कारवाई करण्यात येत आहे.

    साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम 1897 तसेच आपत्ती व्यवस्था कायदा 2005 च्या साथरोग सर्व संबंधित तरतुदीनुसार शासनाने कोरोना संसर्ग रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन करणे, सर्व बार अँण्ड रेस्टॉरंट, लेडिज बार व इतरांना बंधनकारकर करण्यात आलं आहे. सोमवार ते शुक्रवार 50 टक्के बैठक क्षमतेने सायं 4 वाजेपर्यंत बार, रेस्टॉरंट सुरू ठेवण्याचे तसेच सायंकाळी 4 नंतर व शनिवार आणि रविवार फक्त टेक अवे, पार्सल सुविधा व होम डिलिव्हरी सेवा सुरू ठेवण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन केलेल्या पंधरा आस्थापना महापालिकेने आज सील केल्या.

    या कारवाईतंर्गत ठाण्यातील तलावपाळी येथील आम्रपाली बार, तीन पेट्रोल पंप येथील अ‍ॅन्टीक पॅलेस बार, उपवन येथील नटराज बार, सिनेवंडर येथील आयकॉन बार, कापुरबावडी येथील स्वागत बार, नळपाडा येथील नक्षत्र बार, पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील के-नाईट बार, ओवळा नाका येथील स्टरलिंग बार, मॉडेला नाका येथील अ‍ॅन्जेल बार, उपवन येथील सुर संगम बार, भाईंदरपाडा येथील खुशी आणि मैफील बार, वागळे इस्टेटमधील सिझर पार्क बार, नौपाड्यातील मनिष बार आणि कापूरबावडी येथील सनसिटी बार असे एकूण पंधरा लेडीजबार सील करण्यात आले आहेत.

    सदरच्या सर्व कारवाया अतिक्रमण व निष्कासन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर, प्रणाली घोंगे, शंकर पाटोळे आणि विजयकुमार जाधव यांनी यांनी महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या सहाय्याने केल्या.