thane rest room cleaning

अवघ्या दोन दिवसात महापालिकेने शहरातील रेस्ट रुमच्या दुरुस्तीच्या कामाला(rest room repair) सुरुवात केली असून लवकरच ते महिलांसाठी सुरु होतील, असा विश्वास भाजपच्या महिला ठाणे शहर जिल्हाअध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी व्यक्त केला आहे.

ठाणे: तब्बल १० कोटींचा खर्च करुन ठाणे महापालिका(thane corporation) आणि स्मार्टसिटीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या २८ अर्बन रेस्ट रुमपैकी(rest room) नव्वद टक्के रुम बंद असल्याच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले होते. तसेच महासभेत देखील या संदर्भात आवाज उठविला होता. अखेर अवघ्या दोन दिवसात महापालिकेने शहरातील रेस्ट रुमच्या दुरुस्तीच्या कामाला(rest room repair) सुरुवात केली असून लवकरच ते महिलांसाठी सुरु होतील, असा विश्वास भाजपच्या महिला ठाणे शहर जिल्हाअध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजपच्या महिला मोर्चाचे हे यश असल्याचेही त्यांनी सांगितले.

गुरुवारी सकाळी ठाणे जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा मृणाल पेंडसे यांच्या नेत्तृत्वाखली भाजपच्या महिला मोर्चाने घोडबंदर भागातील मानपाडा येथील अर्बन रेस्टरुम जवळ आंदोलन केले होते. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या महासभेत चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली होती. महासभेत मृणाल पेंडसे यांनी याच मुद्याला हात घालून हे अर्बन रेस्ट रुम केव्हा सुरु होणार असा सवाल केला. ठाणेकरांच्या पैशांची उधळपटटी करुन हे रेस्टरुम आजही बंद का आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अधिकारी वारंवार खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचे कामही करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात उपायुक्त मनीष जोशी यांनी शहरातील बहुसंख्य रेस्ट रुम सुरु असल्याचा दावा केला होता. मात्र आता त्यांचा हा दावा फोल ठरल्याचेही दिसत आहे.

भाजप महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनानंतर आणि महासभेत जाब विचारल्यानंतर महापालिकेच्या संबंधिंत विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणाच्या रेस्ट रुमची दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. मानपाडा तिनहात नाका, आनंद सिनेमागृह, श्री मॉं विद्यालय कोपरी, कळवा स्टेशन जवळील रेस्ट रुमचे कामच पूर्ण करण्यात येऊन येथील वीज पुरवठा सुरु करण्यात आला आहे. कासारवडवली येथील रेस्ट रुम, वाघबीळ, कापुरबावडी आणि कोलशेत घाट रेस्ट रुमच्या दुरुस्तीचे कामही सुरु झाले आहे.

गेली दोन वर्षे हे रेस्ट रुम धूळ खात पडून होते. मात्र भाजप महिला मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही याला वाचा फोडली, तसेच महासभेत चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांची तोंडेही आता बंद झाली आहे. आता ही रेस्ट रुम लवकरच सुरु होऊन महिलांसाठी खुली होतील आणि त्यांची सार्वजनिक ठिकाणी होणारी गैरसोय थांबेल.

- मृणाल पेंडसे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा, ठाणे