ठाणे शहर तलावांचे शहर नाही तर आता बनले ‘हातगाड्यांचे शहर’

ठाणे महापालिकेची शुकवारची महासभा पादचारी पुलावरून टीका टीप्पणी,प्रश्नोत्तरे यातच पार पडली. अखेरच्या क्षणी शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर होत नसलेल्या कारवाईबाबत अशोक वैती यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच,यासंदर्भात लक्षवेधी मांडुन शहरातील बजबजपुरीला वाचा फोडली. यासाठी न्यायालयीन निर्देशावरही भाष्य करून सण-उत्सवात पोलीस कारवाई करतात.

    ठाणे: एकेकाळी ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून नाव लौकिक होते. मात्र आता याच शहराला हातगाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले असल्याचा आरोप सभागृह नेते अशोक वैती यांनी केला. शुक्रवारी झालेल्या ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत लक्षवेधी मांडली होती, यामध्ये हा मुद्दा चांगलाच गाजला. दरम्यान पालिका आयुक्त तसेच, सहाय्यक आयुक्तांकडे तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याची खंत वैती यांनी व्यक्त करीत या संदर्भात लक्षवेधी मांडली. तसेच,जर प्रशासन या हातगाड्यांवर कारवाई करत नसेल तर आमच्या पद्धतीने हे प्रकरण तडीस लावू असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिल्याने शिवसेनेच्या सत्ताकाळात अनधिकृत कामांचा एकप्रकारे भांडाफोड झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

    ठाणे महापालिकेची शुकवारची महासभा पादचारी पुलावरून टीका टीप्पणी,प्रश्नोत्तरे यातच पार पडली. अखेरच्या क्षणी शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर होत नसलेल्या कारवाईबाबत अशोक वैती यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच,यासंदर्भात लक्षवेधी मांडुन शहरातील बजबजपुरीला वाचा फोडली. यासाठी न्यायालयीन निर्देशावरही भाष्य करून सण-उत्सवात पोलीस कारवाई करतात. पण रस्तोरस्ती हातगाडया असताना त्यावर कारवाई का नाही असा सवालही केला. काहीजण यातुन वसुलीही करीत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधताना शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे यांचाही उल्लेख केला.

    दरम्यान,वैती यांच्या लक्षवेधीवर शिवसेना नगरसेवकांसह इतर पक्षाच्या नगरसेवकांनी देखील चर्चा केली. हातगाडीवर कारवाई करताना एखाद्या नगरसेवकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला किंवा फोन केल्यास ही बाब रेकॉर्डवर आणावी. याला समर्थन असल्याचे भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी सांगितले. अनेक ठिकाणी फेरीवाल्यांच्या बाजूला अतिक्रमण विभागाची गाडी असूनही कारवाई होत नाही. तर अनेक वेळा केवळ थातुरमातुर कारवाई केली जाते.

    ठाणे स्टेशन आणि नौपाडा परिसरात बसणारे फेरीवाले ठाण्याच्या बाहेरचे असल्याचे तसेच,स्थानिक महिलांना व्यवसाय करण्यास प्राधान्य द्यावे. अशी मते भाजपचे नगरसेवक सुनेशी जोशी व प्रतिभा मढवी यांनी मांडताना फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कापूरबावडी परिसरात रस्त्यावरील हातगाड्याकडून हप्ते घेतले जात असल्याचा आरोप करून देवराम भोईर यांनी प्रभाग समितीकडून फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याचे म्हटले. तसेच, फेरीवाल्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. अशी आग्रही मागणी भोईर यांनी केली.