Thane Mayor Naresh Mhaske refuted the MNS allegations

विरोधी पक्ष म्हणून व्यवस्थित काम करा, राजकारणात काम करत असताना आरोप करा, मात्र आरोप करताना जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या सेवेकरांचा अपमान करू नका अशी कळकळीची विनंती महापौर नरेश म्हस्के यांनी केली.

ठाणे : ठाण्यात कोरोना रुग्णाच्या आकडेवारीत गदारोळ असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी मनसेने केला होता. तसेच स्मशानभूमीत कार्यरत असलेल्या कामगारांना सेवेतून काढण्यात आल्याच्या विरोधातही मनसेने आंदोलन केले होते. सत्ताधारी शिवसेनेवर आरोप करणाऱ्या मनसेला महापौर नरेश म्हस्के(Thane Mayor Naresh Mhaske ) यांनी उत्तर दिले आहे. कृपया घाणेरडे राजकारण करू नका मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो असे महापौरांनी म्हंटले आहे.

ठाण्यात कोरोना संदर्भात योग्य पाऊले उचलली जात असून ठाणे महापालिका पारदर्शक काम करत आहे. पहिल्या दिवसापासून प्रत्येक रुगांची योग्य आकडेवारी दिली जात आहे. ठाणे पालिकेच्या हद्दीत वाढणारे, कमी होणारे, मृत होणारे कोरोना रुग्ण यांची आकडेवारी थोतांड असल्याचे म्हणत महापौरांनी मनसेचे आरोप फेटाळले आहेत.

ठाणे शहराच्या नऊ विविध प्रभाग समितीत स्मशान भूमीत कोरोनाचे मृतदेहांवर अग्निसंस्कार करणाऱ्या ठेकेदारावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांना अचानक घरी बसविल्याच्या प्रकाराने मनसेने आक्रमक पवित्रा हाती घेतला होता. या संपूर्ण प्रकारची चौकशी करावी अशी देखील मागणी यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, हे सर्व आरोप खोटे असून यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे यावेळी म्हस्के यांनी सांगितले.

विरोधी पक्ष म्हणून व्यवस्थित काम करा, राजकारणात काम करत असताना आरोप करा, मात्र आरोप करताना जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या सेवेकरांचा अपमान करू नका अशी कळकळीची विनंती महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी केली.