Thane Metro works cause foul smell of sewage water in the subway and harassment of citizens due to mosquitoes
मेट्रोच्या कामांमुळे भुयारी मार्गात गटाराचे पाणी ; दुर्गंधी आणि मच्छरांच्या त्रासामुळे नागरिक हैराण

गेल्या शनिवारी हे काम सुरू असताना सांडपाणी वाहून नेणारी एक मोठी वाहिनी फुटली होती. आणि त्यातून येणारे पाणी हे या भुयारात मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. जागोजागी पाण्याची डबकी आणि तळी सर्वत्र या भुयारात दिसत आहेत. येथे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना या घाण पाण्याचा वास आणि मच्छर यांचा दुहेरी सामना करावा लागत आहे.

ठाणे : ठाण्याच्या नितीन जंक्शन येथे असणारा भुयारी मार्ग हा अनेकवेळा चर्चचा विषय ठरला आहे. याच भुयारी मार्गाच्या वर पूर्व द्रुतगती महामार्ग असून मेट्रोचे काम सुरू आहे. याच भुयारी मार्गात आता गटाराचे पाणी उतरले असल्याची चर्चा असून सूज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मेट्रोचे काम जोरदार सुरू असून याच कामांमुळे गटाराचे पाणी भुयारी मार्गात झिरपत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भुयारी मार्गात साचलेल्या गटाराच्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून येथून ये – जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

नितीन कंपनी चौकात असलेल्या भुयारी मार्गात ( सबवे) आता गटाराच्या पाण्याचे तळे जागोजागी दिसत आहेत. त्याला निमित्त ठरले आहे या सबवे च्या वर सुरू असलेल्या मेट्रो कामाचे. हा सबवे लोकांसाठी उपयोगी ठरत असताना आता मात्र लोकांना घाण पाण्याच्या डबक्यातून चालावे लागत आहे. या भुयाराच्या वर मेट्रोचे खोदकाम सुरू आहे. गेल्या शनिवारी हे काम सुरू असताना सांडपाणी वाहून नेणारी एक मोठी वाहिनी फुटली होती. आणि त्यातून येणारे पाणी हे या भुयारात मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. जागोजागी पाण्याची डबकी आणि तळी सर्वत्र या भुयारात दिसत आहेत. येथे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना या घाण पाण्याचा वास आणि मच्छर यांचा दुहेरी सामना करावा लागत आहे. याबाबत पालिका अधिकाऱ्यांना सांगितले होते, पण अजून काहीच हालचाल झाली नसल्याचे येथील सुरक्षा रक्षकांनी सांगितले.

मेट्रो कामाच्या खोद कामाचे काम करणाऱ्या कामगाराने याबाबत सांगितले की शनिवारी ही पाईप फुटली, हे सर्व गटाराचे पाणी असल्याने आम्ही ते तात्पुरत्या स्वरूपात दुसरीकडे वळवले आहे. पण अद्यापही हे पाणी मोठ्या प्रमाणात भुयारात झिरपत आहे. याबाबत पालिका उपायुक्त संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता हे काम तातडीने हाती घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.