ठाण्यात छातीत स्क्रू ड्रायव्हर खुपसून मुलाने केली आईची हत्या

आरोपी विशाल एलझेंडे हा अविवाहित युवक मुंब्रा येथे आपली आई उर्मिला एलझेंडे हिच्यासोबत राहत होता. विशाल जी काही कमाई करायचा, त्या पैशांची उधळपट्टी करायचा. त्यानंतर आईकडे सतत पैशांची मागणी करत राहायचा. त्यामुळे मायलेकात कायम खटके उडत असत.

    ठाण्यात एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पैसे देण्याच्या वादावरून मुलाने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. छातीत स्क्रू ड्रायव्हर खुपसून मुलाने आपल्या आईची हत्या केली.  मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरातून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल एलझेंडे हा अविवाहित युवक मुंब्रा येथे आपली आई उर्मिला एलझेंडे हिच्यासोबत राहत होता. विशाल जी काही कमाई करायचा, त्या पैशांची उधळपट्टी करायचा. त्यानंतर आईकडे सतत पैशांची मागणी करत राहायचा. त्यामुळे मायलेकात कायम खटके उडत असत.

    सोमवारी दुपारी देखील पैशांवरुन दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर राग अनावर झाल्याने विशालने जवळच पडलेला स्क्रू ड्रायव्हर आईच्या छातीत खुपसला. विशालने केलेला वार एवढा गंभीर होता की आई जागीच गतप्राण झाली. मुंब्रा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आरोपी विशालला अटक केली. मयत उर्मिला एलझेंडे हिचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे,अशी माहिती मुंब्रा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

    दरम्यान, या आधिही एक धक्कादायक घटना कोल्हापूरात घडली होती. या घटनेत आरोपीला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच फाशीची शिक्षा सुनावली. 28 ऑगस्ट 2017 रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती. दारुसाठी पैसे न दिल्याने सुनील कुचकोरवी याने आईची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर आईचे अवयव भाजून खाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी नराधम मुलाला बेड्या ठोकल्या होत्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासातील ही पहिलीच फाशीची शिक्षा ठरली.