कोरोना बधितांच्या हातावर शिक्का मारण्यासाठी ठाणे महापालिकेकडे शाईच नाही; कैफियत मांडणाऱ्या अधिकाऱ्यालाच पालकमंत्र्यांनी सुनावले

गेल्या तीन आठवडयापासून ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये दररोज ९०० ते १००० च्या आसपास कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. यापूर्वी शहरात दररोज ७० ते ८० रुग्ण आढळून येत होते. रुग्णसंख्येत अचानकपणे वाढ झाल्यामुळे महापालिका यंत्रणा दक्ष झाली असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

  • जिल्हाधिकारी कार्यालयाला शाई मागितली मात्र दिली नाही
  • पालकमंत्र्यांच्या बैठकीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मांडली अजब कैफियत

ठाणे : ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून लक्षणे नसलेले मात्र घरीच उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्का मारण्यासाठी ठाणे महापलिकेकडे शाईच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. ठाणे महापलिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाला शाई मागितली मात्र ती देण्यात आली नसल्याची तक्रार ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी असलेलं डॉ. राजू मुरुडकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना केली. यावर पालकमंत्री शिंदेंनी ही अजब कैफियत मांडणाऱ्या अधिकाऱ्याला चांगलेच सुनावले. बुधवारी ठाणे महापालिका हद्दीत वाढता कोरोना संदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार राजन विचारे, महापौर नरेश म्हस्के यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

ठाणे महापलिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दरम्यान ठाण्यात ६ हजार ५०० हून अधिक लक्षणे नसलेले आणि घरीच राहूनच उपचार घेत असलेले कोरोना रुग्ण आहेत. यांना ओळखता यावेत तसेच या रुग्णांच्या बेजबाबदारपणामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी पालिका प्रशासनाने अशा रुग्णांच्या हातावर शिक्का मारण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे तसेच महापलिकेकडे शाईच नसल्याने अशा रुग्णांवर शिक्का मारता येत नसल्याचे बाब समोर आली आहे.

गेल्या तीन आठवडयापासून ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये दररोज ९०० ते १००० च्या आसपास कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. यापूर्वी शहरात दररोज ७० ते ८० रुग्ण आढळून येत होते. रुग्णसंख्येत अचानकपणे वाढ झाल्यामुळे महापालिका यंत्रणा दक्ष झाली असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. शहरामध्ये आढळून येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसतात. त्यामुळे ते शासनाच्या नियमानुसार घरीच उपचार घेतात. असे रुग्ण घराबाहेर पडले तर त्यांच्यामुळे संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे अशा रुग्णांना ओळखता यावे यासाठी त्यांच्या हातावर शिक्के मारले जात होते.

गेल्या महिन्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्याने ही पद्धत बंद करण्यात आली होती. परंतु शहरात आता रुग्ण वाढू लागल्यामुळे पालिका प्रशासनाने घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या हातावर शिक्के मारावे असे यावेळी खासदार राजन विचारे यांनी सांगितले असता आपल्याकडे शाईच नसून जिल्हाधिकारी कार्यालयाला आपण शाई मागितली होती, मात्र त्यांनी ती दिली नसल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. मुरुडकर यांनी सांगितले. यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भडकून लवकरात लवकर शाई ची व्यवस्था करा आणि कामाला लागा अशा सूचना केल्या.