कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे पोलीस रस्त्यावर, नियम मोडणाऱ्यांवर करणार कडक कारवाई

वाढत्या रुग्णसंख्येने पोलीस आणि पालिका प्रशासन सतर्क झाले असून ठाण पोलिसांनी पुन्हा एकदा जोरदार तयारी केली आहे. ठाणेनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत रेल्वे स्टेशन, बस डेपो आणि मार्केट परिसर असे दिवसरात्र गजबजलेले विभाग असल्याने ठाणेनगर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जास्तच सतर्क झालेले आहेत.

    ठाणे : कोरोनाने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरायला सुरुवात केली असून ठाण्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. वाढत्या रुग्णसंख्येने पोलीस आणि पालिका प्रशासन सतर्क झाले असून ठाणे पोलिसांनी पुन्हा एकदा जोरदार तयारी केली आहे. ठाणेनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत रेल्वे स्टेशन, बस डेपो आणि मार्केट परिसर असे दिवसरात्र गजबजलेले विभाग असल्याने ठाणेनगर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जास्तच सतर्क झालेले आहेत.

    शनिवारी दिवसभर वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी आणि त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी गस्त सुरु केली असून नागरिकांना मास्क वापरून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहन करत असल्याचे दिसत होते. मास्क न वापरणाऱ्या तब्बल ४४ जणांवर प्रत्येकी रुपये ५०० दंड करण्यात आला असून सर्व हॉटेल, लॉज आणि लग्नाच्या हॉल वाल्याना नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले गेले आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे सोमवंशी यांनी सांगितले.

    दरम्यान काँग्रेसने नुकतेच महागाई विरोधात काढलेल्या मोर्च्या वेळी अनेकांनी मास्क वापरला नव्हता, तर काहींनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन देखील न केल्याने गुन्हे दाखल केल्याची माहिती सोमवंशी यांनी दिली. ठाणे शहरातील बाजारपेठ परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने ठाणे नगर पोलीस स्टेशन २४ तास रस्त्यावर उतरून काम करत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी शासनाच्या निर्णयाचे पालन करावे, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.