ठाणे आर.टी.ओ. मधील बोगस अधिकारी नंदकिशोर नाईक यांच्या चौकशीची मागणी

भिवंडी : महाराष्ट्र राज्यच्या परिवहन विभाग विशेषतः या परिवहन विभागा अंतर्गत असणारा आर.टी.ओ. ठाणे कार्यालय हा भ्रष्टाचाराचा अड्डा समजला जातो. वाहन विषयक सुविधा देणे व वाहनाच्या माध्यमातून कर

भिवंडी  : महाराष्ट्र राज्यच्या परिवहन विभाग विशेषतः या परिवहन विभागा अंतर्गत असणारा आर.टी.ओ. ठाणे कार्यालय हा भ्रष्टाचाराचा अड्डा समजला जातो. वाहन विषयक सुविधा देणे व वाहनाच्या माध्यमातून कर गोळा करून तो शासनाच्या तिजोरीत जमा करणे हे परिवहन विभागाचे मुख्य कर्तव्य आहे. परंतु ठाणे परिवहन विभाग हा नाममात्र काम करीत असून तेथील अनेक कर्मचारी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपले उखळ पांढरे करीत आहेत. ठाणे आर.टी.ओ. कार्यालयास दलालांचा पडलेला विळखा प्रत्यक्ष ब्रह्मदेवपण सोडवू शकत नाही. तसेच खाजगी लोकांच्या सेवा शासकीय कामात सर्रास वापर करणे, बोगस ऑटो रिक्षा बॅज देणे, बोगस रिक्षा परमिट देणे, वाहन कर वसुलीमध्ये अफरातफर करणे ही कामे ठाणे आर.टी.ओ. च्या कामकाजाचा अपरिहार्य भाग बनली आहे. 

असे असताना ठाणे आर.टी.ओ. मध्ये एक नवीन धक्कादायक प्रकार राष्ट्रीय मानव हक्क मंचाचे अध्यक्ष श्री. शरद धुमाळ यांनी केलेल्या माहिती अधिकार अर्जामधून उघड झाला आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत असणारे नंदकिशोर नाईक यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केलेल्या कार्यालयीन कामकाजाची माहिती तसेच नाईक यांच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती श्री. शरद धुमाळ यांनी माहिती अधिकार अर्जानुसार विचारली असता नंदकिशोर नाईक हे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कामकाज करण्यात सपशेल अपयशी ठरल्याची माहिती प्राप्त झाली असून श्री. नाईक यांची शैक्षणिक पात्रता देखील बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
नंदकिशोर नाईक यांनी मोटार वाहन निरीक्षक म्हणून परिवहन सेवे सारख्या शासकीय सेवेत प्रवेश केला आहे. मोटार वाहन निरीक्षक म्हणून पदस्थापना देताना आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता नंदकिशोर नाईक यांच्याकडे नसल्याचे उघड झाले असून मोटार वाहन निरीक्षक ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून नाईक यांनी पदोन्नती प्राप्त केल्या आहेत. शैक्षणिक अहर्तता नसताना देखील केवळ बनवेगिरी करून नाईक यांनी शासकीय सेवेत प्रवेश मिळवला असून शासनाकडून कोट्यावधी रुपयाचे वेतन, भत्ते व सुविधा मिळविल्या आहेत. त्यामुळे शासनाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून नंदकिशोर नाईक यांच्या शासकीय सेवेतील बोगस प्रवेशाबाबत सखोल चौकशी करून त्यांचेवर सक्त कायदेशीर कारवाई होण्यासाठी राष्ट्रीय मानव हक्क मंचचे अध्यक्ष श्री. शरद धुमाळ यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांना निवेदन सादर केले असून या प्रकरणी शासनाकडून कोणती कारवाई केली जाते याकडे सुजाण नागरिकांचे लक्ष लागले आहे.