ठाणे वन्यप्राणी तस्करीचा अड्डा; स्टार प्रजातीच्या ७० कासवाची आतापर्यंत वनविभागाने केली सुटका 

स्टार प्रजातीच्या या कासवांची आंतरराष्ट्रीय बाजारात तस्करी करण्यात येते. तर दुसरीकडे घरात कासव पाळणे शुभ मानले जाते. त्यामुळे हौसेपोटी अनेकजण या अशा दुर्मिळ कासवांना घरात पाळतात.  ठाणे वन विभागाने गेल्या दोन वर्षांत विविध ठिकाणी कारवाई करून ७० स्टार कासव जप्त केली होती.  हे कासव ठाणे वन विभागाच्या ताब्यात आहेत.

  • सुटका केलेल्या स्टार कासवांची रवानगी ताडोबाच्या जंगलात करणार
  • कर्नाटक ऐवजी आता ताडोबाच्या जंगलात सोडणार वन्यप्राणी

ठाणे : स्टार कासव ही प्रजाती भारतीय असून ती वन्यजीव सुरक्षा कायद्यांतर्गत येत आहे. दरम्यान या प्रजातीच्या कासवाला पाळणे आणि तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. अशाच स्टार प्रजातीची ७० कासवे वनविभागाच्या धडक कारवाईत आतापर्यंत हस्तगत करण्यात आली.

या स्टार प्रजातीच्या कासवांची रवानगी प्रथमच कर्नाटक ऐवजी ताडोबाच्या जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांनी दिली. यापूर्वीच ठाण्यात वन्यप्राणी, पक्षी यांच्या तस्करीवर वनविभागाने कारवाई केलेली आहे. त्यामुळे ठाणे हे तस्करांचा अड्डा झाला आहे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

ठाण्यात तस्करी करून घरातच बेकायदेशीर स्टार प्रजातीच्या कासव असल्याची माहिती मिळाल्यावरून वनविभागाने आतापर्यंत केलेल्या कारवाईत तब्बल ७० स्टार प्रजातीचे कासव हस्तगत केली असून त्यांची सुटकाही केली. जवळपास ७० स्टार कासव हे टप्प्याटप्प्याने ताडोबाच्या जंगलात सोडण्याची सुरुवात करण्यात आल्याची माहितीही शर्मा यांनी दिली.

स्टार प्रजातीच्या या कासवांची आंतरराष्ट्रीय बाजारात तस्करी करण्यात येते. तर दुसरीकडे घरात कासव पाळणे शुभ मानले जाते. त्यामुळे हौसेपोटी अनेकजण या अशा दुर्मिळ कासवांना घरात पाळतात.  ठाणे वन विभागाने गेल्या दोन वर्षांत विविध ठिकाणी कारवाई करून ७० स्टार कासव जप्त केली होती.  हे कासव ठाणे वन विभागाच्या ताब्यात आहेत.

कासवांना ताडोबा अभयारण्यात सोडणार

यापूर्वी अशा प्रकारच्या कासवांना वातावरणाच्या अनुशंघाने कर्नाटकाच्या जंगलात सोडण्यात येत होते. त्यामुळे पकडलेल्या कासवांना कर्नाटक राज्याच्या जंगलात सोडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती, मात्र ताडोबाच्या जंगलात स्टार प्रजातीचे कासव आढळल्याने आता वनविभागाच्या ताब्यात असलेले ७० स्टार कासव हे टप्याने ताडोबाच्या जंगलात सोडणार आहेत. आतापर्यंत वनविभागाने २१ कासव हे ताडोबाच्या जंगलात सोडले आहेत. त्या कासवांची प्रकृती स्थिर राहिल्यास अन्य कासवांनाही सोडणार आहेत. राज्याबाहेर कासवांना सोडण्याऐवजी राज्यातच कासवांना ठेवण्याचा प्रयोग पहिल्यांदाच होत असल्याचे उप वनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी सांगितले.

वनविभागाने केलेल्या विविध कारवाईत स्टार प्रजातीचे कासव हस्तगत केले आहेत. त्यांना आता ताडोबाच्या जंगलात अनुकूल वातावरणात सोडण्यात येणार आहे. पहिल्यांदाच पहिल्या टप्प्यात कासव सोडण्यात आले आहेत. या कासवांनी ठाणे ते ताडोबा जंगल असा दोन दिवसाचा प्रवास केला आहे. या कासवांना एका कंटेनरमध्ये घेऊन जाण्यात आले. तर दर तीन तासांनी कंटेनर थांबवून त्यांची तपासणी करावी लागत होती.

पवन शर्मा (मानद वन्यजीव रक्षक, वनविभाग)