Thanekar gets good news for Thackeray government's year; Eknath Shinde thanked the Chief Minister

ठाण्यातील, विशेषतः मूळ शहरातील जुन्या, धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याने हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

ठाणे : ठाकरे सरकारच्या(thackeray government) वर्षपूर्तीला ठाणेकरांना एक गूड न्यूज मिळाली. ठाण्यातील, विशेषतः मूळ शहरातील जुन्या, धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्द्ल असतानाच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे(eknath shinde) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(cm uddhav thackeray) यांचे आभार मानले आहेत.

मुंबई वगळता राज्यभरात एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीला (युनिफाईड डीसीआर) मंजुरी दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी ठाण्यातील जुन्या, धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्गही मोकळा केला आहे. ६ मीटर रस्त्यांची रुंदी ९ मीटरपर्यंत वाढवण्याच्या ठाणे महापालिकेच्या प्रस्तावाला नगरविकास विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे ठाण्यातील, विशेषतः मूळ शहरातील जुन्या, धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याने हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ठाणे महापालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याबद्दल महापौर नरेश म्हस्के यांनी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

जुन्या शहरातील रस्ते अरुंद असल्यामुळे येथील जुन्या व धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडला होता. इंसेंटिव्ह एफएसआय, टीडीआर आदींचा लाभ घेता येत नसल्याने पुनर्विकास व्यवहार्य होत नसल्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास रखडला होता. त्यामुळे गेली अनेक वर्षे ठाण्यातील काही नागरिक धोकादायक इमारतीमध्ये आपला जीव मुठीत घेवून राहत होते. सदर प्रश्न मार्गी लागावा यासाठी अनेकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून या रस्त्यांच्या रुंदीकरणाची मागणी केली होती. या अनुषंगाने महापालिकेने देखील ६ मीटर रुंदीचे रस्ते ९ मीटरपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर करून अंतिम मान्यतेसाठी शासनदरबारी पाठविला होता.

मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देत ठाण्याच्या जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केला आहे. राज्यशासनाने घेतलेल्या महत्वाकांक्षी ‍निर्णयामुळे ठाणे शहरात  आनंदाचे वातावरण पसरले असून महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ  शिंदे यांचे ठाणेकरांच्या वतीने अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहे.