‘त्या’ हल्लेखोराने पाठीमागून माझ्यावर जीवघेणा हल्ला केला : कल्पिता पिंपळे

ठाणे शहरातील महिला सहाय्यक आयुक्तावरील हल्ल्यानंतर सर्वपक्षीयांनी शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात संताप व्यक्त करून सहाय्यक आयुक्तांची पाठराखण केली आहे. तर जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हल्लेखोरावर कारवाई करण्याचे तसेच अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत. यासाठी व्यापक उपाय योजना कऱण्याची मागणी करण्यात आली.

  ठाणे : घोडबंदर येथील अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही गेलो असताना त्या हल्लेखोराने माझ्यावर पाठीमागून जीवघेणा हल्ला केला असून त्यामध्ये मी सुदैवाने मी बचावली आहे, मात्र माझी बोटे निकामी झाली असून मी लवकरच बरी होऊन पुन्हा माझे कर्तव्य बजावण्यासाठी मी रस्त्यावर उतरणार असल्याची प्रतिक्रिया माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी दिली आहे. अश्या हल्ल्यांना आम्ही घाबरणार नसून पुन्हा आम्ही उभे राहू असे पिंपळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

  ठाणे शहरातील महिला सहाय्यक आयुक्तावरील हल्ल्यानंतर सर्वपक्षीयांनी शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात संताप व्यक्त करून सहाय्यक आयुक्तांची पाठराखण केली आहे. तर जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हल्लेखोरावर कारवाई करण्याचे तसेच अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत. यासाठी व्यापक उपाय योजना कऱण्याची मागणी करण्यात आली.

  ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अशा प्रकारचे हल्ले खपुन घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट करून फेरीवाल्यांच्या मुजोरीला वेळीच वचक बसवण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. तर भाजप,काँग्रेस, मनसेकडूनही या घटनेचा निषेध करून फेरीवाल्यांविरोधात व्यापक उपाय योजना करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाणे शहरातील सर्वच घटकाकडून महापालिका अधिकाऱ्यारील हल्ल्याविरोधात व्यापक आवाज उठवण्यात आला.

  महिला अधिकारी शांत बसणार नाहीत

  जिल्हाधिकारी कार्य़ालय, ठाणे महापालिका, भिवंडी महापालिकासह जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. तसेच अशा हल्ल्यांना घाबरून महिला शांत बसणार नसून दुप्पट वेगाने या विरोधात कारवाई करतील, असा दावा या महिलांनी केला. तसेच संबंधित हल्लेखोरावर जलदगतीने कडक कारवाई करण्यासाठी पाठपुरावाही करण्याचा दावा या महिलांकडून करण्यात आला.

  हल्ल्यानंतर महापलिकेची “सुसाट” कारवाई

  सोमवारी झालेल्या हल्ल्यानंतर ही महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशाने मंगळवारी शहरातील विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईतंर्गत नौपाडा – कोपरी प्रभाग समितीमधील ठाणे स्टेशन, सॅटिस परिसर, जांभळी नाका, नौपाडा आणि गावदेवी मंदिर परिसर तसेच कळवा प्रभाग समितीमधील कळवा स्टेशन पूर्व, कळवा भाजी मार्केट, सहकार बाजार, कळवा नाका, खारेगाव मार्केट व पारसिक रोड परिसर या ठिकाणी असणाऱ्या फेरीवाल्यांवर कडक कारवाई करत त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. दिवा प्रभाग समितीमधील साईधाम अपार्टमेंट, मुंब्रा देवी कॉलनी येथील अनधिकृत इमारतीचे कॉलम बीम व स्लॅब तोडण्यात आला.

  अधिकाऱ्यावरील हल्ला संतापजनक व दुर्दैवी ; हप्तेबाजीमुळे मुजोर फेरीवाले मोकाट – आमदार संजय केळकर

  मुजोर फेरीवाल्याने कार्यक्षम महिला अधिकाऱ्यावर केलेला हल्ला संतापजनक व र्दुदैवी असून त्याला कठोर शासन झालं पाहिजे, हा हल्ला जीवघेणा असून तपासात कोणतीही कसूर न ठेवता शिक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रीया आ. संजय केळकर यांनी दिली. तसेच,हप्तेबाजीमुळे फेरीवाले मोकाट सुटल्याचा आरोप केळकर यांनी केला. ठाणे शहरात बेकायदा फेरीवाले व अनधिकृत बांधकाम धारकांच्या हप्तेबाजीतुन करोडो रूपयांची उलाढाल होत आहे. त्यामूळेच या अनधिकृत फेरीवाल्यांची दादागिरी, मुजोरपणा वाढला असून यांचे गॉडफादर कोण आहेत ? यांना कोण संरक्षण देतो ? हे शोधून त्यांच्यासुध्दा वेळीच मुसक्या आवळल्या पाहिजेत. अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत फेरीवाले यांना संरक्षण देणाऱ्यांवर वेळीच कारवाई करावी. अशी मागणी आ. संजय केळकर यांनी केली आहे.