‘बीएसयूपी’च्या इमारतीची लिफ्ट चोरीला; कल्याण-डोंबिवली महापालिका मात्र अनभिज्ञ

केंद्र सरकारच्या बीएसयुपी योजनेतून 2007 साली या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती. कचोरे, उंबर्डे, बारावे परिसरात या योजनेतून 7272 घरे प्रस्तावित असली तरी यातील 2500 घराचे काम पूर्ण झाले आहे.

    कल्याण (Kalyan) : केंद्र सरकारच्या कोट्यवधी रुपयाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या बीएसयुपी योजनेतील इमारतीमधील घराची लाभार्थ्यांना प्रतीक्षा असताना या रिकाम्या इमारतीमधील लिफ्टच चोरी झाल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेतील कचोरे परिसरात घडली आहे; मात्र याबाबत पालिका प्रशासन अनभिज्ञ आहे. यापूर्वी या इमारतीमधील खिडक्याची तावदाने, ग्रील, दरवाजे, मीटरबॉक्स, विजेच्या वायर्स आणि अगदी लाद्या देखील चोरांनी पळवल्या असून आता इमारतीची लिफ्ट देखील काढून नेल्याने या इमारतीची वाताहत झाली आहे.

    दरम्यान याबाबत पालिका प्रशासनाने याप्रकरणाची माहिती घेत गुन्हा दाखल केला जाणार असून या इमारतीची सुरक्षा करण्यासाठी तीन शिफ्ट मध्ये सुरक्षा रक्षक नेमण्याचा किवा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले मात्र कॅमरा समोर बोलण्यास नकार दिला.

    कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने गरिबांना इमारतीत घरे देण्यासाठी केंद्र सरकारच्या बीएसयुपी योजनेतून 2007 साली या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती. कचोरे, उंबर्डे, बारावे परिसरात या योजनेतून 7272 घरे प्रस्तावित असली तरी यातील 2500 घराचे काम पूर्ण झाले आहे तर 1600 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले असून हजारो घरे लाभार्थ्याच्या प्रतीक्षेत आहेत.

    बीएसयूपी अंतर्गत कचोरे येथे 1082 घरे तयार असून यातील 200 घराचा ताबा देण्यात आला आहे तर 882 घरे रिकामी आहेत. यातील 545 घरे रेल्वेला विकण्यात आली असून आतापर्यत यातील 56 घराचा ताबा घेतला गेला आहे. मात्र याखेरीज आणखी काही इमारती रिकाम्या असून कचोरे येथील बंद असलेल्या या घराच्या खिडक्या, ग्रील, दरवाजे, मीटरबॉक्स, विजेच्या वायर्स आणि लाद्या केव्हाच चोरीला गेल्या असून आता एका इमारतीची लिफ्टच चोरीला गेली आहे. तर दुसरी लिफ्ट निम्म्याहून अधिक गायब असून उर्वरित लिफ्टचे सामान थोडेथोडे काढून नेले जात असल्याचे दिसत आहे.

    मात्र याबाबत पालिका प्रशासनाला कोणतीही माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ३ महिन्यापूर्वी या ‘बीएसयूपी’च्या  इमारतीमधील खिडक्याची ग्रील आणि दरवाजे चोरून नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता याबाबत पालिका आयुक्तांनी पोलिसांना पत्र देत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र तरीही इमारती मधील वस्तूची चोरी थांबण्याची चिन्हे नसून आता तर चोरांनी लिफ्ट चोरून पालिका प्रशासनाला खुले आव्हान दिले आहे. दरम्यान याप्रकरणी बाधित लाभार्थ्यांनी येत्या 15 दिवसात आपल्याला आपल्या हक्काच्या घराचा ताबा न मिळाल्यास जबरदस्तीने ताबा घेणार असल्याचा इशारा दिला आहे.