वादळाने वीज वितरण यंत्रणेचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता

डोंबिवली : ३ आणि ४ जून रोजी अतितीव्र चक्री वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वादळामुळे कल्याण परिमंडलातील वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होऊन वीजपुरवठा बाधित होण्याची तसेच अपघाताची शक्यता

 डोंबिवली :  ३ आणि ४ जून रोजी अतितीव्र चक्री वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वादळामुळे कल्याण परिमंडलातील वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होऊन वीजपुरवठा बाधित होण्याची तसेच अपघाताची शक्यता लक्षात घेऊन वीज ग्राहकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे. 

महावितरणची बहुतांश वीज वितरण यंत्रणा उघडयावर आहे. संभाव्य अतितीव्र वादळामुळे महावितरणच्या या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. चक्री वादळामुळे विजेचे खांब, रोहित्र कोसळण्यासोबतच वीजवाहक ताराही तुटू शकतात. परिणामी अशा ठिकाणी दीर्घ काळापर्यंत वीजपुरवठा बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणने संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन या परिस्थतीला तोंड देण्याची तयारी केली आहे. 

 संभाव्य अडचण पाहता नागरिकांनी मोबाईल, इन्व्हर्टर संपूर्णपणे चार्ज करून ठेवावेत. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या भरून ठेवाव्यात, जेणेकरून अडचणीच्या परिस्थितीत त्रास होणार नाही. अपघातांची शक्यता गृहीत धरून वीज वितरण यंत्रणांपासून सुरक्षित अंतर राखावे व संभाव्य नैसर्गिक आपत्तीत महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे.