बारवी धरणाचे पाणी शेतात शिरले

मुरबाड : बारवी धरण भरून वाहण्याच्या ७२ . ६० मीटर या पातळी पेक्षाही जास्त पाणी साठल्याने तालुक्यातील तोंडली , मानिवली व कोळे वडखळ येथील शेतीत पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कोळे वडखळ गावात होडीने जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बांधावरही पाणी आले आहे.

३१ ऑगस्ट रोजी बारवी धरण भरून वाहू लागल्याने मानिवली गावाजवळ पाण्याची पातळी ७३.१० मीटर तर तोंडली व कोळे वडखळ येथे पाण्याची पातळी ७२.७० मीटर पेक्षा जास्त वाढली. त्यामुळे एमआयडीसीने संपादित केलेल्या जमिनी व्यतिरिक्त संपादित न केलेल्या शेतजमिनीत धरणाचे पाणी घुसल्याने भातशेतीचे नुकसान झाले आहे.

कोळे वडखळ गाव तर पूर्ण पाण्याने वेढले असून येथे नागरिकांना होडीने जाण्यासाठी बांधलेल्या धक्क्यावर पाणी आल्याने ये जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.एमआयडीसीने या परस्थितीचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बाधित शेतकरी करत आहेत.