कल्याण डोंबिवलीतही वाजणार तिसरी घंटा, नाट्यगृहाच्या भाड्यात ७५ टक्के सवलत

कोविड-१९ चा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील इतर सर्व नाटयगृहांप्रमाणेच आचार्य प्र.के. अत्रे रंगमंदिर व सावित्रीबाई फुले कलामंदिर ही दोन्ही नाटयगृहे  २३ मार्च पासून बंद ठेवण्यात आली आहेत. कोविड- १९ च्या आपत्कालीन परिस्थितीत राज्यातील सर्व नाटयगृहे बंद असल्यामुळे नाटय व्यवसायास उतरती कळा लागली होती.

कल्याण : मुंबई आणि ठाण्यापाठोपाठ कल्याण डोंबिवलीतही तिसरी घंटा वाजणार असून कल्याण डोंबिवलीतील नाट्यगृह खुली करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या नाट्यगृहांच्या भाड्यात ७५ टक्के सवलत देण्याचा मोठा निर्णय पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे. याबाबतची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोविड-१९ चा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील इतर सर्व नाटयगृहांप्रमाणेच आचार्य प्र.के. अत्रे रंगमंदिर व सावित्रीबाई फुले कलामंदिर ही दोन्ही नाटयगृहे  २३ मार्च पासून बंद ठेवण्यात आली आहेत. कोविड- १९ च्या आपत्कालीन परिस्थितीत राज्यातील सर्व नाटयगृहे बंद असल्यामुळे नाटय व्यवसायास उतरती कळा लागली होती.

सद्यस्थितीत राज्यशासनाने राज्यातील नाटयगृहे काही अटी/शर्तींचे पालन करुन ५० टक्के आसन क्षमतेवर सुरु करण्यास परवानगी दिली आहे. परंतू दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च, अपुरा प्रेक्षकवर्ग ही बाब लक्षात घेऊन कोविड साथीचा प्रादुर्भाव सूरु असेपर्यंत नाटयगृहांच्या भाडयामध्ये सवलत मिळावी अशी विनंती जागतिक मराठी नाटयधर्मी निर्माता संघ यांनी २३ नोव्हेंबर रोजी पत्राद्वारे केली आहे.

सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता नाट्य व्यवसाय व त्या अनुषंगाने त्यांच्यावर अवलंबून असणा-या इतर संस्था, कामगार वर्ग इत्यादींचा व्यवसाय सुरु राहावा आणि मराठी नाटयसंस्था कायम कार्यरत राहावी या दृष्टीकोनातून ३१ मार्च २०२१ पर्यंत रुपये ३०० रुपये तिकीट दरांपर्यंत मूळ भाडयामध्ये ७५ टक्के सवलत देण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नाटयसंस्थेने नाटकाचे तिकीट दर रुपये ३००  पेक्षा जास्त आकारल्यास नियमानुसार नियमित भाडे आकारले जाणार आहे. सदरची सवलत कोविड-१९ ची महामारीची साथ लक्षात घेऊन देण्यात येणार आहे. मार्च २०२१ नंतर कोविड-१९ महामारीच्या साथीच्या अनुषंगाने या सवलतीचा फेरआढावा घेऊन कार्यवाही करण्यात येईल. ही सवलत देतांना इतर दर पूर्वीप्रमाणे लागू राहणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.