kdmc commisioner vijay suryavanshi

या प्रकल्पाच्या 'दुर्गाडी ते टिटवाळा' टप्प्यामध्ये अनेक घरं बाधित होत असून या बधितांचे पुनर्वसन झाल्याशिवाय घरांवर कारवाई होणार नाही असे आश्वासन केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (Dr. Vijay Suryavanshi) यांनी दिले आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीमधील (KDMC) वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या ‘रिंगरूट’ प्रकल्पाचे काम जोरदार सुरू आहे. या प्रकल्पाच्या ‘दुर्गाडी ते टिटवाळा’ टप्प्यामध्ये अनेक घरं बाधित होत असून या बधितांचे पुनर्वसन झाल्याशिवाय घरांवर कारवाई होणार नाही असे आश्वासन केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (Dr. Vijay Suryavanshi) यांनी दिले आहे. या प्रकल्पातील बाधितांनी आज माजी आमदार नरेंद्र पवार (Narendra Pawar)  यांच्या नेत्तृत्वाखाली पालिका आयुक्तांची भेट घेतली.

रिंगरूट प्रकल्प (Ring route Project) हा कल्याण-डोंबिवलीच्या दृष्टीने महत्वाचा असून त्याचे जोरदार काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या दुर्गाडी ते टिटवाळा या टप्प्यातील वाडेघर, अटाळी, मांडा, टिटवाळा भागात सुमारे ८५० घरे बाधित होत आहेत. केडीएमसी अधिकारी वारंवार या भागात जाऊन घरे खाली करण्यास सांगत होते. त्यामूळे इथले नागरिक भयभीत झाले असून त्यापैकी एका नागरिकाने आत्मदहनाचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर आज आपण महापालिका आयुक्तांची भेट घेतल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली.

त्यावेळी इथल्या नागरिकांचे पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही इथले काम सुरू करणार नसल्याचे आश्वासन केडीएमसी आयुक्तांनी या बैठकीत दिल्याचेही नरेंद्र पवार यांनी सांगितले. तसेच इथल्या नागरिकांचे पुनर्वसन बीएसयूपीच्या घरांमध्ये करण्याची सूचनाही पवार यांनी यावेळी केली. तर आमचं घर तुटेल या चिंतेने आम्ही सर्व जण घाबरून गेलो होतो. मात्र केडीएमसी आयुक्तांनी दिलेल्या या आश्वासनानंतर आम्हाला दिलासा मिळाल्याची भावना प्रदीप सुपे यांनी व्यक्त केली.

केडीएमसी आयुक्तांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळामध्ये माजी आमदार नरेंद्र पवार, मोहने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर, उपाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्यासह प्रकल्पबाधितांचे प्रतिनिधी उपस्थित होते.