वृक्षारोपणासाठी महापालिका क्षेत्रात जमिनी नाहीत, आता वृक्षारोपणासाठी जागा द्या

डोंबिवली : कल्याण डोंबिवली परिसर हरित करण्याचे स्वप्न पालिकेचे आहे. त्यादृष्टीने रिंग रोडमध्ये २१०० झाडे बाधित झाली, त्याबदल्यात महापालिकेने आंबिवली परिसरात पाचपट जास्त झाडे केवळ लावली नाहीत तर

 डोंबिवली : कल्याण डोंबिवली परिसर हरित करण्याचे स्वप्न पालिकेचे आहे. त्यादृष्टीने रिंग रोडमध्ये २१०० झाडे बाधित झाली, त्याबदल्यात महापालिकेने आंबिवली परिसरात पाचपट जास्त झाडे केवळ लावली नाहीत तर ती छानपणे जगवली पण आहेत. मात्र यंदा महापालिका व वनविभाग यांच्याकडे वृक्ष लागवड करण्यासाठी मोकळे भूखंड नाही. आता मोकळ्या जमिनी नाहीत असे सांगण्यात येत असल्याने यंदा मोठया प्रमाणात वृक्षारोपण होणं कठीण दिसत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका, मुंबई महानगर विकास प्राधिकरण व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंबिवली परिसरात सुमारे १५००० झाडे लावून जगवली आहेत. यामध्ये वड, पिंपळ, चिंच, आंबा, पेरू, उंबर, फणस, कडुनिंब अशी विविध प्रकारची झाडे लावून गेल्या तीन वर्षांत त्याची छान जोपासना सुद्धा केली आहे. मात्र ही झाडे जगवण्यासाठी प्रथमच सौर ऊर्जेवर चालणारी ठिबक सिंचन पद्धत अवलंबविण्यात आली आहे. हा प्रकल्प म्हत्वाकाकांक्षी असल्याचे सांगण्यात आले. विविध प्रकारची फळझाडे असल्याने विविध पक्षी मोठया संख्येने येऊ लागले आहेत. या परिसरात पक्षी उभारण्याचा संकल्प पालिकेचा आहे. नियोजनपूर्वक साकारलेला हा प्रकल्प भविष्यात पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास प्रशासनाला आहे

महापालिका क्षेत्रातसुमारे ८-९ लाख झाडे असून २७ गावे सामील झाल्याने झाडाची संख्या दुप्पट झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्याचा पालिकेचा विचार असला तरी महापालिका विभागात मोकळा भूखंड नाही. हीच अवस्था वनविभागाची आहे यामुळे हरित कल्याण डोंबिवलीचे स्वप्न धूसर होण्याची भीती आहे.

याबाबत उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या मते महापालिकेच्या मालकीचे मोकळे भूखंड आज मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्यासाठी शिल्लक नाहीत. हीच गत वनविभागाची आहे. यामुळे पावसाळ्यात मोठ्या संख्येने वृक्ष लागवड करणे शक्य होईल असे दिसत नाही. रस्ते, दुभाजक व आरक्षित भूखंडावर वृक्षारोपण करण्यात आले आहे.