bhivandi hospital

भिवंडी: भिवंडी (bhivandi) शहरातील स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा या शासकीय रुग्णालयात(civil hospital) प्रसूतीसाठी आलेल्या महिलेकडून लाच प्रकरणात(bribe case) रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकाला जिल्हा शल्य चिकित्सक यांनी नोटीस बजावल्याने वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.विशेष म्हणजे या नोटिसीत रुग्णांना सेवा देण्याच्या कामात हलगर्जीपणा,भ्रष्टाचार आणि  रुग्णालयात गैरकारभार सुरु असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

भिवंडी शहरात राहणारी जैनब इनामदार या गर्भवती महिलेला १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमाराला प्रसूतीवेदना होत असल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी या ठिकाणी कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी या गर्भवती महिलेकडून प्रसूतीसाठी लाच स्वरूपात पैशांची मागणी केली होती. मात्र ही महिला त्यांची मागणी पूर्ण करू शकली नाही.त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी या महिलेकडे दुर्लक्ष करून तिच्यासोबत आलेल्या महिलेकडून तिची प्रसूती करून घेतली. त्यांनतर पैशांची मागणी पूर्ण करू न शकल्याने तिला रुग्णालयातून तात्काळ घरी जाण्याची परवानगीही नाकारल्याचा आरोप भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केला आहे.

यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार देण्यात आली होती. या लेखी तक्रारीची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी गंभीर दखल घेत स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील  वैद्यकीय अधीक्षक यांना नोटीस बजावून १२ तासाच्या आत या नोटिसचा खुलासा करावा.तसेच या प्रकरणी तातडीने चौकशी करून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात सादर करावा असेही नमूद केले आहे.

दरम्यान याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनिल थोरात यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता मी त्यावेळी कोविडने आजारी असल्याने रुग्णालयात उपस्थित नव्हतो. आजच रुग्णालयात आलो आहे.माझ्या ठिकाणी दुसऱ्या डॉक्टरांना चार्ज दिली होता.विशेष म्हणजे रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ठाण्यातील एका राय नावाच्या ठेकेदाराला कंत्राटी पद्धतीवर प्रसूती गृहाचा ठेका देण्यात आला आहे. आम्हाला जिल्हा शल्य चिकित्सक यांची नोटीस प्राप्त होताच संबधित ठेकेदाराला तातडीने नोटीस बजावण्यात आली असून त्यांनी या प्रकरणातील दोन कर्मचारी महिलांना निलंबित केले आहे.