Thousands of unauthorized constructions started within the limits of MMRDA in Bhiwandi taluka
भिवंडी तालुक्यातील एमएमआरडीएच्या हद्दीत हजारो अनधिकृत बांधकामे सुरू

  • आयुक्तांकडून कारवाईची मागणी

भिवंडी (Bhiwandi) : ठाणे (Thane) जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण (Kalyan) व अंबरनाथ (Ambernath) या तालुक्यातील पंचायत समिती अखत्यारीतील काही गावे एमएमआरडीएच्या (MMRDA) अधिपत्याखाली सन २०१८ मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. मात्र, बांधकाम करताना एमएमआरडीएकडून बांधकाम परवानगी न घेता सदरची परवानगी ग्राम पंचायतीकडून प्रोसेसिंग बुकमध्ये मागील तारीख टाकून परवानगी विकत घेत असल्याचे तपासणी मध्ये दिसून आले आहे.

सदरच्या बांधकामवर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कोणतीच कारवाई न केल्याने एमएमआरडीएचे आयुक्त आर राजीव (commissioner r rajiv) यांनी जातीने लक्ष घालून संबधित बांधकामाची परवानगी देणाऱ्या ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्यांकडून होत आहे.

भिवंडी तालुक्यातील एमएमआरडीएच्या हद्दीत ग्राम पंचायतीच्या आशिर्वादाने मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे उभी असून यामध्ये कशेळी (४०० एकर ), काल्हेर (६०० एकर), कोपर (१५० एकर), पूर्णा (एक हजार एकर), राहनाळ (५०० एकर), वळ (६०० एकर), दापोडा (६०० एकर), गुंदवली (३०० एकर), ओवळी (३०० एकर), माणकोली (१०० एकर), सोनाळे (२०० एकर), वालिशद (२०० एकर), कोन (३०० एकर) , पिंपळघर (१०० एकर), पिपळास (१०० एकर), वडपा (४०० एकर), कुकसा – बोरिवली (४०० एकर), पडघा (२०० एकर), सरवली (२०० एकर), कारिवली (२०० एकर) आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे ग्राम पंचायतीचे ग्राम सेवक व विस्तार अधिकारी यांच्याशी संगनमत करून विकासकांनी अनधिकृत गोदामे थाटली आहेत.

स्थानिक राजकीय पुढारी, सरकारी अधिका-यांच्या अभद्र युतीमुळे विकासकांना अनधिकृत बांधकामे उभी करण्यासाठी आश्रय मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष पुरवून येथील वास्तुविशारदाची सनद तत्काळ रद्द करावी अशी मागणी एमएमआरडीएचे आयुक्त आर राजीव यांच्याकडे भिवंडी पंचायत समितीचे सदस्य यांनी केली आहे.