मुरबाडच्या टायगर स्टील कंपनीच्या कामगारांवर उपासमारीची वेळ, कंपनी सुरू करण्यास टाळाटाळ होत असल्याने कामगारांनी तहसीलदारांकडे घेतली धाव

मुरबाड: मुरबाडमधील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र कुडवली येथे असणाऱ्या टायगर स्टील इंजिनीअरींग या कंपनीने कामगारांचा दोन महिन्यांच्या पगार थकवल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही कंपनी सुरू

मुरबाड: मुरबाडमधील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र कुडवली येथे असणाऱ्या टायगर स्टील इंजिनीअरींग या कंपनीने कामगारांचा दोन महिन्यांच्या पगार थकवल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही कंपनी सुरू करण्याबाबतही कंपनी व्यवस्थापन कोणत्याही प्रकारची पावले उचलत नसल्याने कामगारांनी मुरबाडचे तहसीलदार अमोल कदम यांना एका लेखी निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.

मुरबाडमधील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र कुडवली येथे असणाऱ्या टायगर स्टील इंजिनीअरिंग कंपनीत कायमस्वरूपी असे स्थानिक शंभरच्या आसपास कामगार काम करीत आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ही कंपनी बंद आहे. मुरबाड तालुक्यात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नसल्या कारणाने तालुका ग्रीन झोनमध्ये येत आहे. त्यामुळे येथील पन्नास टक्के कारखाने पूर्ववत सुरू झाले आहेत.असे असले तरी टायगर स्टील कंपनी प्रशासन मात्र  कंपनी चालू करण्यास टाळाटाळ करीत आहे. तर लॉकडाऊन काळातील मार्च व एप्रिल या महिन्यांचा पगारही  कामगारांना दिला गेला नाही. याबाबत कंपनी व्यवस्थापक विजयकुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

 
आमची सध्या उपासमार सुरू आहे.आमचा पगार लवकरात लवकर मिळावा, तसेच कंपनी लवकर सुरू नं झाल्यास कामगार आयुक्तांकडे दाद मागण्यात येईल.
                                                                                                                                                                                          – संजय देसले, कामगार