महावितरणच्या कारभाराला कंटाळून नगरसेविकेचा कार्यालयाबाहेर ठिय्या -टिटवाळ्यात दररोज ७ ते ८ तास वीज गायब

कल्याण : कोरोनावर मात करण्यासाठी सरकारने लॉकडाऊन लागू केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबण्याचे आवाहन शासनातर्फे केले जात असले तरी टिटवाळ्यातील नागरिकांनी घरात

 कल्याण : कोरोनावर मात करण्यासाठी सरकारने लॉकडाऊन लागू केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबण्याचे आवाहन शासनातर्फे केले जात असले तरी टिटवाळ्यातील नागरिकांनी घरात थांबायचे कसे, असा सवाल उपस्थित केला आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे टिटवाळ्यात दिवसांतून ७ ते ८ तास वीज गायब झाल्याने नागरिक त्रस्त असून याबाबत जाब विचारण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर तथा स्थानिक नगरसेविका उपेक्षा शक्तिवान भोईर यांनी सोमवारी रात्री महावितरणच्या कार्यालयाबाहेर ठिय्या दिला.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत येणाऱ्या टिटवाळ्याचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून याठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे टिटवाळ्यातील अनेक परिसर आणि सोसायट्या सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना घरात थांबण्याशिवाय पर्याय नाही. मात्र याठिकाणी महावितरणचा गलथान कारभारामुळे दिवसांतून ७ ते ८ तास वीज गायब असते. त्यामुळे घरात थांबायचे कसे असा सवाल नागरिक करत आहेत. सध्या सुरू असणाऱ्या लॉकडाऊन काळात देखील महावितरणचे लोडशेडींग सुरू आहे. बहुतांश लोकं ही वर्क फ्रॉम होम करत असल्या कारणाने वीज पुरवठा खंडित काळात कामात व्यत्यय येत आहे. त्याशिवाय घरात लाहान मुले वृद्ध मंडळी ह्यांना देखील उन्हाळ्याचा तडख्याला सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊन असल्या कारणाने कोणीही घराबाहेर पडत नाहीत व घरात विजे अभावी आणि उन्हाळ्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अशा तक्रारी माजी उपमहापौर आणि स्थानिक नगरसेविका उपेक्षा भोईर यांना प्राप्त होताच त्यांनी याबाबत जाब विचारण्यासाठी महावितरणचे कार्यालय गाठले. 

 टिटवाळ्यातील  महावितरणचे अधिकारी कार्यालयात गैरहजर असून संपर्कासाठी दिलेला मोबाईल नंबर बंद व सर्व कर्मचारी सुद्धा बेफिकीरपण उत्तरे देत असल्याचे भोईर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांच्या संयमाचा बांध तुटला. त्यांनी नागरिकांना होणार त्रास महावितरणच्या कर्मचाऱ्यांना समजावा यासाठी कार्यालयातच बसवले. स्वतः नगरसेविका उपेक्षा भोईर या लाईट येईपर्यंत कार्यालया बाहेरच ठिय्या मांडून होत्या. यावेळी त्यांनी या समस्यांवर कायम स्वरूपी तोडगा निघावा यासाठी महावितरण अभियंता अग्रवाल यांना इथल्या समस्यांची जाणीव करून दिली. महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री  नितीन राऊत यांचे ओ.एस.डी. सावडतकर यांच्याशी चर्चा करून त्यांना या सर्व महावितरणच्या समस्यांबाबत तक्रार केली तेव्हा त्यांनी या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढू असे आश्वासन दिले.