शासन मान्यताप्राप्त स्वस्त धान्य दुकानात मोफत तांदळासाठी तोबा गर्दी

डोंबिवली : शहरातील शासन मान्यताप्राप्त सर्वच स्वस्त धान्य दुकानातून गेले दोन दिवस मोफत तांदूळ विक्री करण्यात सुरुवात झाली आहे. डोंबिवली शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून पालिका

डोंबिवली : शहरातील शासन मान्यताप्राप्त सर्वच स्वस्त धान्य दुकानातून गेले दोन दिवस मोफत तांदूळ विक्री करण्यात सुरुवात झाली आहे. डोंबिवली शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून पालिका प्रशासन हतबल झाले आहे. मात्र असे असले तरी रेशन दुकानातील मोफत धान्य खरेदीसाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली असून नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात अग्रेसर दिसत नाहीत.शहरातील सामाजिक कार्यकर्ते नागरिकांना सतत विनवणी करून दोघांमधील अंतर ठेऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याची विनवणी करीत आहेत. पालिका, पोलीस प्रशासन आणि डॉक्टरवर्ग जीवाची पूर्वा न करता काम करीत असले तरी कोरोनाचे संक्रमण कमी करण्यास नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे.

डोंबिवली शहरात पूर्व-पश्चिम विभागात सुमारे १६० रेशन दुकाने असून यांचा कारभार सुरळीत चालू ठेवण्यासाठी ९-१० रेशनिंग इन्स्पेक्टर प्रत्येक वेळी रीतसर तपासणी करीत असतात. शहरात या दुकानांना धान्य पुरवठा शासनाच्या भिवंडी येथील गोडाऊन मधून करण्यात येतो. यासाठी मालवाहू वाहतूक करण्याचा ठेका दोन संस्थाना देण्यात आला असल्याची माहिती रेशनिंग अधिकारी यांनी दिली. सध्या लॉकडाऊनमध्ये टाळेबंदी असल्याने कामगारांचा प्रश्न जटील झाल्याने धान्यमालाची चढ-उतार करण्यासाठी हमालांची कमतरता आहे. मोफत तांदूळ विक्री पूर्वीचा कोटा रेशनिंग दुकानात पोहोचविण्यासाठी ठेकेदारांची तारांबळ उडत आहे. शासनाने जाहीर केल्यानंतर आता सुमारे २५ दिवसानंतर मोफत तांदूळ रेशनिंग दुकानात आला असून तो ताबडतोब मिळावा यासाठी गोर-गरीब नागरिक गर्दी करीत आहेत. नागरिकांना भिती आहे कि जर काही काळाबाजार झाला तर सरकारने दिलेला मोफत तांदूळ मिळणार नाही यामुळे दुकानातून गर्दी वाढत आहे. 

पूर्वेकडील इंदिरानगर झोपडपट्टी येथील रेशनिंग दुकानात होणाऱ्या अलोट गर्दीमुळे पोलिसांना काही काळ हजेरी लावावी लागरी. तशीच परिस्थिती कोपरगांव येथील स्वस्त धान्य दुकानात होती. पश्चिमेकडील ठाकूरवाडी आणि जुनी डोंबिवली येथील सुनील म्हात्रे यांचे साईबाबा धान्य भांडार, शिरीष पाटील यांचे एकविरा आणि ठाकूरवाडी येथील स्वस्त दुकानातून मोफत तांदूळ विक्री करण्यात येत असून यासाठी दुकान मालक आणि विभागातील कार्यकर्ते विशेष नियोजन करीत आहेत.  दुकानांसामोरील भल्या मोठ्या रांगाचा त्रास नागरिकांना होवू नये म्हणून कृष्णा पाटील आणि त्यांचे सहकारी गणेश निंबाळकर मोफत पाणी वाटप करीत आहेत. तसेच येथील शाखाप्रमुख धनाजी चौधरी सकाळी ५.३० वाजता रांगेत उभ्या राहणाऱ्या नागरिकांना रेशनिंग नंबर पासेस देऊन त्यांना तासंतास रांगेपासून मुक्त करीत आहेत.

समाजसेवक मुकेश पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते कामे करीत असून जितेंद्र आरेकर, गणपत गावडे, अशोक साळवी यांचे विशेष सहकार्य मिळत आहे. यावेळी जरी फक्त मोफत तांदूळ मिळणार असला तरी पुढे गहू आणि डाळ मोफत मिळणार असल्याने पुन्हा नागरिक गर्दी करतील. मोफत मिळणाऱ्या धान्याच्या गर्दीमुळे ‘कोरोना विषाणूचे संक्रमण होणार नाही याची काळजी कोण घेणार अशी चर्चाही होत आहे.