murder

सुशीला जीवन दिघे (३२ रा. काटई ,डोंगरपाडा) असे खून झालेल्या आदिवासी महिलेचे नांव आहे. सदर महिला गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घरातील पाळीव बकऱ्या चारण्यासाठी शेलार गावच्या हद्दीतील डोंगरीवर गेली होती.

    भिवंडी : घरातील पाळीव बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या आदिवासी महिलेचा अज्ञात इसमांनी गळा आवळून खून केल्याची घटना शेलार (डोंगरी )भागात काल सायंकाळी घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सुशीला जीवन दिघे (३२ रा. काटई ,डोंगरपाडा) असे खून झालेल्या आदिवासी महिलेचे नांव आहे. सदर महिला गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घरातील पाळीव बकऱ्या चारण्यासाठी शेलार गावच्या हद्दीतील डोंगरीवर गेली होती.

    मात्र अज्ञात इसमांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने तिने त्यास तीव्र प्रतिविरोध केला.त्यामुळे अज्ञात इसमांनी तिचा गळा आवळून खून केल्याचे सांगण्यात येत आहे.गुरुवारी उशिराने बकऱ्या डोंगरीतून चरून घरी आल्या. मात्र सुशीला घरी परतली नाही.ही बाब मुलांनी वडील कामावरून घरी परतल्यावर सांगितली.त्यामुळे चिंतातुर झालेल्या जीवन याने शेजाऱ्यांच्या सोबतीने सुशिलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.नातेवाईकांकडे चौकशी केली.मात्र सुशिलाचा शोध लागला नाही.

    अखेर ती बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या जंगलाच्या डोंगरी भागात शोधण्याचा प्रयत्न केला असता तिचा मृतदेह एका निर्जन झुडुपात आढळून आला.या घटनेची तालुका पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली असता रात्री उशिराने तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग ,पोलीस उपनिरीक्षक सचिन दाभाडे, वैभव देशपांडे आदी पोलीस अधिकारी आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

    डॉक्टरांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता सुशीला हिचा अज्ञात इसमांनी गळा आवळून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.वैद्यकीय अहवालानुसार तालुका पोलिसांनी सुशीला हिच्या बहिणीची फिर्याद घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून अज्ञात मारेकऱ्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.