काल्हेर येथे महिलेवर गोळीबार करणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून अटक

ट्रान्सपोर्ट व्यावसायिक जखमी महिलेच्या पतीच्या ओळखीचा फायदा घेत त्यांच्या पत्नीचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्या विरोधातील कोणतेही पुरावे नसताना आपल्याकडे तुझे काही गोपनीय फोटो असून ते कोणाला दाखवायचे नसल्यास आपणास ५० हजार रुपये द्यावेत अशी मागणी करून ब्लॅकमेल करीत होते .

भिवंडी : काल्हेर येथे १२ जानेवारी रोजी भरदिवसा घरात घुसून गोळीबार करत गंभीर जखमी केल्याच्या गुन्ह्यात भिवंडी गुन्हे शाखेने आरोपी बाबत कोणताही पुरावा नसताना कसून शोध घेत मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातून दोन गुन्हेगारांना अटक करण्यात यश मिळविले आहे .सुरेंद्र प्रतापसिंह भाटी वय २४, व मानसिंग उर्फ बंटी सदन चौहान वय २० असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

काल्हेर येथील जय माँ दुर्गा अपार्टमेंट या इमारतीत राहणाऱ्या जयश्री शिवराम देडे या घरात असताना दोघा अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून त्यांच्यात बाचाबाची दरम्यान केलेल्या गोळीबारात एक गोळी महिलेच्या डोक्यात लागल्याने यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ठाणे येथे उपचार सुरू आहेत. या गंभीर गुन्ह्याचा तपास नारपोली पोलिसांसह भिवंडी गुन्हे शाखा करीत असताना गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांना माहिती मिळताच त्यांनी आपले पथक मध्य प्रदेश येथे रवाना करून आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना अटक केली आहे.

दरम्यान आरोपींच्या गावात एका महिलेने एकास ब्लॅकमेल करून पैसे उकळल्याचे माहिती असल्याने त्याच पद्धतीने गुन्हा करून पैसे कमविण्याच्या उद्देशाने त्यांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक जखमी महिलेच्या पतीच्या ओळखीचा फायदा घेत त्यांच्या पत्नीचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्या विरोधातील कोणतेही पुरावे नसताना आपल्याकडे तुझे काही गोपनीय फोटो असून ते कोणाला दाखवायचे नसल्यास आपणास ५० हजार रुपये द्यावेत अशी मागणी करून ब्लॅकमेल करीत होते .

त्या उद्देशाने जखमी महिलेकडून पैसे उकळण्यासाठी ते तिच्या घरी येऊन धमकावत असताना तिने देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात बाचाबाची झाल्याने गोळीबार केल्याचा गुन्हा आरोपींनी मान्य केला असून त्यांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त केले असून या दोन्ही आरोपींवर मध्यप्रदेश येथे या पूर्वीही गुन्हे दाखल झाले असून त्याबाबत कसून चौकशी सुरू असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली आहे.