भिवंडीत अमेझॉनचे साहित्य चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक  

भिवंडी: भिवंडी(bhivandi) तालुक्यातील ठाकुरपाडा या ठिकाणी अमेझॉनमधील विविध प्रकारचे ३८२ बॉक्स साहित्य घेऊन जाणारा टेम्पो उभा करून ठेवला असता त्यामधील १ लाख ७७ हजार ८६२ रुपयांचे साहित्य असलेले १३ बॉक्स टेम्पोचे सील तोडून चोरी केल्याप्रकरणी कोनगाव पोलिसांनी दोघा चोरट्यांना गजाआड केले आहे. त्यांच्याकडून चोरीस(theft) गेलेल्या मुद्देमालापैकी १ लाख ४ हजार ९०४ रुपयांचे साहित्य व गुन्हयात वापरलेली ४ लाख रुपयांची एक मारूती सुझुकी कंपनीची इर्टिका कार असा एकूण ५ लाख ४ हजार ९०४ किमतीचा मुददे्माल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.

अमेझॉन बॉम्बेच्या ग्लोबल काॅम्प्लेक्स गंगाराम पाडा, कुकसेगाव येथील गोदामातून विविध कंपनीचे साहित्य असलेले ३८२ बॉक्स ज्यामध्ये बाॅडी लोशन, टाॅय मिक्सर खेळणे, डिझायनर लेडीज सारी,जॉकी मेन्स् काॅटन टिशर्ट, हेडसेटस्, डिशवाॅशर, वायरलेस गेमिंग हॅन्डसेट आदी साहित्य भरलेला टेम्पो चालक राहुलकुमार लखन माहतो याने माल खाली करण्यासाठी अमेझॉन बॉम्बे गोडावून प्रथमेश काॅम्प्लेक्स, एफ.एस.सी. गोडावूनचे मागे, ठाकुरपाडा या ठिकाणी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी उभा करून ठेवला होता.त्या रात्री एक वाजताच्या सुमारास आलेल्या अज्ञात चोरट्यांनी टेम्पोच्या मागील बाजूस असलेले सील तोडून त्यामधील १३ बॉक्सची चोरी करून चोरट्यांनी माल चोरून नेला होता. त्याबाबत चालकांने दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या चोरीच्या गुन्ह्यात पोलीस उपायुक्त राजकुमार शिदे,सहाय्यक पोलीस आयुक्त नितिन कौसडीकर, कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कसोशीने तपास करून अजय  पाटील, स्वप्निल  पाटील या चोरट्यांचा शोध घेवून सदर गुन्ह्यात त्यांना गजाआड केले आहे.या दोघा चोरट्यांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.