siddheshwar talav thane

ठाणे महापालिकेपासून(thane corporation) हाकेच्या अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर तलाव परिसरातील झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करणाऱ्या सुमारे २ हजार कुटुंबांच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न आता साकार होणार आहे. महापालिकेने मंजूर केलेल्या क्लस्टर आराखड्यात सिद्धेश्वर तलावाच्या परिसराचाही(siddheshwar lake area) समावेश झाला आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेपासून(thane corporation) हाकेच्या अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर तलाव परिसरातील झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करणाऱ्या सुमारे २ हजार कुटुंबांच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न आता साकार होणार आहे. महापालिकेने मंजूर केलेल्या क्लस्टर आराखड्यात सिद्धेश्वर तलावाच्या परिसराचाही(siddheshwar lake area) समावेश झाला आहे, घराचे स्वप्न साकार होणार असल्याने रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ठाणे शहरात सिद्धेश्वर तलाव हा पुरातन तलाव आहे. या तलावाभोवती झोपडपट्टीमध्ये दोन हजारांहून अधिक कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. तर अनेक वर्षांपासून या भागात ६० ते ७० जुन्या इमारती आहेत. त्यात अनेक वर्षांपासून शेकडो कुटुंबे राहत आहेत. गेल्या काही वर्षांपासून सिद्धेश्वर तलावानजीकच्या परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास होत होता. मात्र, तलाव परिसराच्या झोपड़पट्टीतील रहिवाशांना जुन्या घरातच राहावे लागत होते.

या भागाचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातूनही विकास करण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर ठाण्यात क्लस्टर योजनेची चाचपणी सुरू झाल्यावर सिद्धेश्वर तलाव परिसराचा क्लस्टर योजनेत समावेश करण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी प्रयत्न केले होते. अखेर क्लस्टर योजनेत सिद्धेश्वर तलाव परिसराचाही समावेश करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे.

सिध्देश्वर तलाव परिसरातील रहिवाशी नव्या घरकुलांच्या प्रतिक्षेत होते. क्लस्टर योजनेत समावेश झाल्यामुळे त्यांना हक्काचे घर उपलब्ध होऊन अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होईल,असे पवार यांनी सांगितले. सिद्धेश्वर परिसर यूआरपी क्र. ९ अनुसार, २१.५६ हेक्टर क्षेत्रावर क्लस्टर उभारले जाईल. सुधारित प्रारुपमधील एकूण आरक्षित व रस्ता क्षेत्रासाठी ७.७८ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे झोपडपट्टीतील सुमारे २ हजार कुटुंबांच्या घराचा प्रश्न सुटणार आहे. त्याचबरोबर परिसरातील अनधिकृत इमारतींचाही क्लस्टरमध्ये समावेश केला जाणार आहे. त्यामुळे शेकडो कुटुंबांना अधिकृत घर उपलब्ध होणार आहेत.