
ठाणे : राज्यात तीन पक्षाचे सरकार असून हे सरकार जास्त काळ ठिकणार नाही अश्या आरोळ्या वारंवार भाजपच्या वतीने दिल्या जात होत्या. मात्र, एक वर्ष उलटून देखील ही सरकार काही पडले नाही. येत्या काही महिन्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकानंतर उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीची झोप उडेल असे सूतोवाच ज्येष्ठ भाजप नेते आशिष शेलार यांनी केले आहे.
अटल बिहारी वाजपेयी याच्या जयंतीनिमित्त भाजपच्या नगरसेविका स्नेहा आंब्रे यांच्या वतीने ठाण्यात एका सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेलार बोलत होते.
विधानपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर भाजपा ने आत्मचिंतन केले असून त्याचे प्रतिबिंब राज्यात लवकरच दिसेल असे ते म्हणाले. एकीकडे कायम हिंदुत्वाची कास धरलेल्या शिवसेनेने अजान स्पर्धा घेतली तर दुसरीकडे देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपई यांच्या जयंती चे औचित्य साधत ठाणे भाजपा तर्फे गीता पठणाची स्पर्धा ठेवल्याने खरा हिंदुत्ववादी पक्ष कोणता हे स्पष्ट झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले असून एकप्रकारे हिंदुत्ववाचा दाखल आम्ही दिला असल्याचे शेलार म्हणाले.
येणारी प्रत्येक निवडणूक भाजप बिनधास्त लढवणार असून भाजप विजयाच्या दिशेने वाटचाल करत राहणार आहे. विधानसभा, विधानपरिषद या निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव झाला असला तरी येणाऱ्या निवडणुकीत भाजप पक्ष विरोधकांना धूळ चाखल्याशिवाय राहणार नाही असेही शेलार म्हणाले.