दिल्लीत अडकलेले युपीएससीचे विद्यार्थी महाराष्ट्रात परतले – खासदार श्रीकांत शिंदेंच्या प्रयत्नांना यश

कल्याण : दिल्लीत युपीएससी स्पर्धा परीक्षा तयारीसाठी गेलेले आणि लॉकडाऊनमुळे अडकलेले महाराष्ट्रातील १ हजार ६०० विद्यार्थी रविवारी रात्री महाराष्ट्रात परतले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी

 कल्याण : दिल्लीत युपीएससी स्पर्धा परीक्षा तयारीसाठी गेलेले आणि लॉकडाऊनमुळे अडकलेले महाराष्ट्रातील १ हजार ६०० विद्यार्थी रविवारी रात्री महाराष्ट्रात परतले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर रेल्वे मंत्रालयाने सोडलेल्या विशेष ट्रेनद्वारे हे सर्व विद्यार्थी महाराष्ट्रात स्वगृही परतले. कोरोनामुळे देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊनमूळे यूपीएससीची तयारी करणारे हे सर्व विद्यार्थी दिल्लीमध्ये अडकून पडले होते. याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्रात परतण्यासाठी विद्यार्थ्यांनी साकडे घातले होते. त्यावर खासदार शिंदे यांनीही राज्य सरकार तसेच केंद्र स्तरावर पाठपुरावा करत या विद्यार्थ्यांना राज्यात परत येण्याचा मार्ग मोकळा करून दिला.

कल्याण रेल्वे स्थानकात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील ८८ विद्यार्थी उतरले. या सर्वांना आपापल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरातून खासगी, टॅक्सी आणि एसटी बसेसचीही सोय करण्यात आली होती. या सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्या सर्वांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले. आपण सुरुवातीपासून या मुलांच्या संपर्कात होतो. या मराठी मुलांची परतण्याची व्यवस्था करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव अभय यावलकर, राज्य शासनाचे सचिव नितीन करीर, दिल्लीतील महाराष्ट्राचे सनदी अधिकारी एस सहाय्य या सर्वांच्या प्रयत्नाने हे सर्व विद्यार्थी आज महाराष्ट्रात परतल्याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. मात्र देशाच्या या भावी सनदी अधिकाऱ्यांना दिल्ली सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या वागणुकीबाबत नाराजी व्यक्त केली. दिल्ली ते महाराष्ट्रच्या या प्रवासात रेल्वेकडून अत्यंत वाईट अनुभव आल्याची प्रतिक्रियाही या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. स्क्रिनिंग करण्यापासून ते रेल्वे प्रवासात सोशल डिस्टन्सिंग पाळण्यापर्यंत कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याची माहिती देत यावरही खासदार डॉ. शिंदे यांनी तातडीने लक्ष घालून आमच्यासाठी खाण्याची व्यवस्था केल्याची माहिती एका विद्यार्थिनीने दिली. तसेच या सर्व विद्यार्थ्यांनी खासदार शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल आभारही मानले.