ठाण्यात लसीकरणास झाली सुरूवात ; ३५३ लाभार्थ्यांचे लसीकरण

लसीबाबत मनात गैरसमज ठेवू नका. या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाही, कोरोनातून मुक्त करण्यासाठी ही लस उपयोगी ठरणार असून आपण सर्वांनी लसीचे स्वागत करुया अशी प्रतिक्रिया डॉ वृषाली गौरवार यांनी यावेळी दिली.

ठाणे : ठाणे शहरात शनिवार पासून कोविड १९ लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे. घोडबंदर रोड येथील ठाणे महापालिकेच्या रोझा गार्डनिया या आरोग्यकेंद्रावर महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली. रोझा गार्डनिया आरोग्यकेंद्रावर डॉ. वृषाली गौरवार यांना पहिली लस देवून या लसीकरणाचा ठाण्यात शुभारंभ करण्यात आला.

लसीबाबत मनात गैरसमज ठेवू नका. या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाही, कोरोनातून मुक्त करण्यासाठी ही लस उपयोगी ठरणार असून आपण सर्वांनी लसीचे स्वागत करुया अशी प्रतिक्रिया डॉ वृषाली गौरवार यांनी यावेळी दिली.

कोरोना संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. गेल्या १० महिन्यापासून कोरोनाशी सामना करताना अनेकांनी प्राण गमावले, त्यांची आठवण आज होणे स्वाभाविक आहे. परंतु अखेर आज लसीकरणास सुरूवात झाली ही निश्चितच आनंदाची बाब असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले.

शासनाच्या सूचनानुसार कोविशिल्ड या लसीकरणास ठाण्यात सुरूवात केली आहे. ठाण्यात १९ हजार लसींचा साठा करण्यात आलेला आलेला आहे. सुरूवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार असून शासनाच्या सूचनांनुसार पालन केले जाणार आहे.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या लसीचे कोणतेही दुष्पपरिणाम नाहीत. लवकरच २८ केंद्रावर लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिली. शासनाच्या सूचनेप्रमाणे लवकरच ही केंद्रे कार्यान्वित करण्यात येतील असेही महापालिका आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

आज एकूण ३५३ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. ही एकूण टक्केवारी ८८.२५ इतकी आहे. यात रोझा गार्डनिया ९७,
कोरस ७७, कळवा ८९, मुंब्रा कौसा ९४ जणांना लस देण्यात आली.